श्लोक ३६ वा
गत्युक्त्युत्सर्गोपादानम् आनन्दस्पर्शलक्षणम् ।
आस्वादश्रुत्यवघ्राणम् अहं सर्वेन्द्रियेन्द्रियम् ॥३६॥
ज्ञान-कर्म उभय इंद्रियें । त्या इंद्रियांचे मी इंद्रिय पाहे ।
त्यांची क्रिया जे जे आहे । ते माझेनि होये अभिव्यक्त ॥६६॥
'गति-ग्रहण-गमन' । 'उत्सर्ग' आणि 'मोहन' ।
'दर्शन' 'स्पर्शन' ' घ्राण' । 'श्रवण' स्वादन' माझेनी । ६७॥
ते इंद्रक्रियेचे चलन । तिळभरी नव्हे मजवीण ।
ऐक त्याचेंही लक्षण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥६८॥
मी मनाचेंही 'महामन' । नयनाचेंही 'नयन' ।
स्पर्शाचेंही 'स्पर्शन' । जिव्हेची जाण 'निजजिव्हा' ॥६९॥
मी घ्राणाचेंही निजघ्राण । श्रवणाचें 'आदिश्रवण' ।
ग्रहणाचें निज 'ग्रहण' । गतीची जाण मी 'गती' ॥२७०॥
मी आनंदाचा 'आनंदु' । मी बुद्धीचाही 'प्रबोधु' ।
सकळ इंद्रियांचा 'विषय स्वादु' । तो मी मुकुंदु उद्धवा ॥७१॥
मी वाचेची 'वाचा' सावकाश । मी परेचाही 'परेश' ।
सकळ इंद्रियांचा मी 'ईश' । यालागीं 'हृषीकेश' नांव माझें ॥७२॥