आरंभ
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
जय जय सद्गुरु अनादी । जय जय सद्गुरु सर्वादी ।
जय जय सद्गुरु सर्वसिद्धी । जय जय कृपानिधि कृपाळुवा ॥१॥
जय जय वेदवाचका । जय जय वेदार्थप्रकाशका ।
जय जय वेदप्रतिपालका । जय जय वेदात्मका वेदज्ञा ॥२॥
जय जय विश्वप्रकाशका । जय जय विश्वप्रतिपाळका ।
जय जय विश्वनिवासका । अकर्तात्मका अव्यया ॥३॥
तुझी अव्यय अक्षर स्थिती । नाहीं नाम रुप वर्ण व्यक्ती ।
तो तूं नांदसी जातिगोतीं । लोकस्थितीव्यवहारें ॥४॥
तुज जगीं नाहीं दुसरें । तो तूं गृहस्थ घरदारें ।
तूं पुरुष ना नपुंसक साचोकारें । कीं स्त्रीपुत्रें नांदसी ॥५॥
अज आणि वंदिसी पिता । अजन्मा तो नमिसी माता ।
जगीं तुझी सर्वसमता । शेखीं अरिमित्रता चाळिसी ॥६॥
तूं जगन्नाथ जगचाळक । कीं एकाचा होसी सेवक ।
तूं परिपूर्ण पूर्णात्मक । कीं मागसी भीक रंकत्वें ॥७॥
तूं नैष्ठिक ब्रह्मचारी । कीं व्यभिचारें तारिसी नारी ।
तूं सर्वज्ञ कीं गुरुच्या द्वारीं । तृणकाष्ठें शिरीं वाहसी स्वयें ॥८॥
जो तूं कळिकाळातें ग्रासिसी । तो तूं बागुलाभेणें लपसी ।
तूं मायानियंता हृषीकेशी । शेखीं माया बांधिजशी उखळीं ॥९॥
तूं आत्माराम नित्यतृप्त । शेखीं गोवळांचा खाशी भात ।
तुझा ब्रह्मादिकां न कळे अंत । तो तूं उभा रडत यशोदेपाशीं ॥१०॥
त्रैलोक्य दाविसी उदरीं । तो तूं गोपिकांचे कडियेवरी ।
तूं जगाचा चाळक श्रीहरी । त्या तुज लेंकुरीं शिकविजे चालूं ॥११॥
जो तूं सर्ववंद्य सर्वेश्वर । तो तूं होसी पांढरा डुकर ।
एवं करितां तुझा निर्धार । वेदांसी विचार कळेना ॥१२॥
वेदीं घेतलें महामौन । ज्ञाते झाले नेणकोण ।
योगी वळंघले रान । तुझें महिमान कळेना ॥१३॥
मुख्यत्वें जन्म नाहीं ज्यासी जाण । तो कृष्ण कैसें दावी मरण ।
तें ऐकावया निरुपण । परीक्षिती पूर्ण श्रद्धाळू ॥१४॥
प्रथमाध्यायीं वैराग्यार्थ । मुसळ बोलिलें शापयुक्त ।
तेंचि ग्रंथावसानीं एथ । असे पुसत परीक्षिती ॥१५॥