श्लोक ४ था
एकस्यैव ममांशस्य जीवस्यैव महामते ।
बन्धोऽस्याविद्ययानादिर्विद्यया च तथेतरः ॥४॥
रितीवाढी असे अग्नीसी । तेथ फुणगे उसळले आकाशीं ।
रितीवाढी नाहीं स्वरूपासी । असंभाव्यासी ठावो कैंचा ॥२४॥
जेणें पाविजे निजबोधातें । ते बुद्धी उद्धवापाशीं वर्ते ।
यालागीं कृष्ण म्हणे महामते । उद्धवातें अतिप्रीतीं ॥२५॥
अतिप्रीतीं पुरस्करून । उद्धवासी म्हणे सावधान ।
ये श्लोकींचा अर्थ गहन । ते धारणा जाण धरावी ॥२६॥
यालागीं कृष्णजगजेठी । उद्धवाची पाठी थापटी ।
अतिगुह्याची गुह्य गोष्टी । तुझे कृपेसाठीं मी बोलतों ॥२७॥
पाठी थापटावयामिसें जाण । करीत स्वशक्तिसंचरण ।
तेणें अद्वयबोधलक्षण । उद्धवासी जाण प्रकाशी ॥२८॥
जीव एकचि त्रिजगतीं । हें जाण उद्धवा निश्चितीं ।
जेवीं नाना दीपांचिया दीप्ती । तेजाची ज्योति अभिन्न ॥२९॥
दोनी दीप एक होती । तैशी टिवळीं ऐक्या न येती ।
जडत्वापाशीं भेदप्राप्ती । ऐक्यवृत्ती अजडत्वीं ॥१३०॥
चंदनकुटके बहुवस । परी सर्वीं एकुचि सुवास ।
तेवीं जीवरूपें मी अविनाश । परमपरेश आभासे ॥३१॥
जीवरूपें तूं श्रीकृष्ण । हें सत्य मानावें वचन ।
तैं भवपाशादि बंधन । तुजचि जाण आदळलें ॥३२॥
ऐशी कल्पिसी जरी वार्ता । ते मज न घडे गा सर्वथा ।
जेवीं शरीरासी प्राण चाळिता । शरीरअवस्था त्या नाहीं ॥३३॥
लिंगशरीरीं स्वयंभ । जीव तो मदंशें प्रतिबिंब ।
त्यासी देहादि बंधनभाव । मिथ्या विडंब आभासे ॥३४॥
घटें आवरिला अवकाश । त्या नांव म्हणती घटाकाश ।
घटभंगें त्या नव्हे नाश । तेवीं मी अविनाश जीवत्वीं ॥३५॥
थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । तो गगन सांडोनि थिल्लराआंतौता ।
नाहीं रिघाला तत्त्वतां । तेंवी मी जीवत्वा अलिप्त ॥३६॥
रवि छिल्लरीं बिंबला दिसे । तेवीं मी लिंगदेहीं आभासें ।
मिथ्या तेथींचें भोगपिसें । तें बंधन कैसें मज लागे ॥३७॥
येथें बोलणें न लगे बहु । प्रतिबिंबा नांव जीवू ।
मुख्य बिंब तो मी शिवु । विशद उगवू हा जाण ॥३८॥
तलाव विहिरीं नाना थिल्लरीं । सूर्यु प्रतिबिंबे त्यांमाझारीं ।
तितुकीं रूपें दिवाकरीं । पाहतां अंबरी तंव नाहीं ॥३९॥
तैसें एकाही जें अनेकत्व । तें मिथ्या जाण जीवत्व ।
हें भागवताचें निजतत्त्व । शुद्ध सत्त्व ज्ञानाचें ॥१४०॥
थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । चंचल निश्चल मळिणता ।
हे थिल्लराचे गुण तत्त्वतां । प्रतिबिंबमाथां मानिती ॥४१॥
तेवीं शिवासी बाधकता । पाहतां नाहीं गा सर्वथा ।
हें अविद्याकार्य तत्त्वतां । जीवाचे माथां मानिती ॥४२॥
एवं मिथ्या जीवभेद सर्वथा । त्यासी बद्धता आणि मुक्तता ।
विद्या अविद्या निजपक्षपाता । दावी तत्त्वतां निजकर्में ॥४३॥
त्या जीवाभासासी प्रस्तुत । नित्यबद्ध नित्यमुक्त ।
एकासी दोनी अवस्था येथ । असे दावित विद्या अविद्या ॥४४॥
जेवीं जळीं बिंबला सविता । त्या जळाची चंचळनिश्चळता ।
या प्रतिबिंबासीच अवस्था । मुख्य सविता ते नेणें ॥४५॥
तेवीं जीवांची बद्धमुक्तता । परमात्म्यासी न लगे सर्वथा ।
जेवीं का अंधारींच्या खद्योता । न देखे सविता कल्पांती ॥४६॥
जळीं आकाश दिसे बुडालें । परी तें कांही झालें नाही वोलें ।
तेवीं अविद्येसी अलिप्त ठेलें । असें संचलें निजरूप ॥४७॥
एक बद्ध एक मुक्त । हें जीवाचिमाजीं भासत ।
तेंही मी सांगेन निश्चित । सावचित्त परियेसीं ॥४८॥
सहस्त्रघटीं जळ भरितां । एकचि सहस्त्रधा दिसे सविता ।
तेथ येचि घटींची जी अवस्था । त्या घटस्था लागेना ॥४९॥
तेथ जो घट होय चंचळू । त्यांतील प्रतिबिंब लागे आंदोळूं ।
परी दुजे घटीं जें निश्चळू । तें नव्हें चंचळू याचेनि ॥१५०॥
तेथ एकें दैवबळें । सूक्ष्म छिद्रें घटे जळ गळे ।
तें प्रतिबिंब निजबिंबीं मिळे । येर सकळें तैसींचि ॥५१॥
तेवीं गुरुकृपाउजियेडें । ज्याचें लिंगदेह विघडे ।
त्यासी परमात्म्यासी ऐक्य घडे । येर ते बापुडे देहबंदीं ॥५२॥
हेंचि निरूपण पुढें । श्लोकसंगती सुरवाडें ।
तें मी सांगेन वाडेंकोडें । अतिनिवाडें निश्चित ॥५३॥