श्लोक ३८ वा
अविद्यमानोऽप्यवभाति हि द्वयोर्ध्यातुर्धिया स्वप्नमनोरथौ यथा ।
तत्कर्मसंकल्पविकल्पकं मनो बुधो निरुन्ध्यादभयं ततः स्यात् ॥३८॥
पुरुषासी जो प्रपंचु दिसे । तो नसतांचि मिथ्या आभासे ।
जेवीं कां एकला निद्रावशें । स्वप्नीं निजमानसें जग कल्पी ॥८॥
असोनि निद्रावश दिसे स्वप्न । जो जागा होवोनि आपण ।
करुं बैसे मनोरथध्यान । तो नसतेंचि जन वन एकत्वीं देखे ॥९॥
हो कां घालोनि आसन । जो करी मूर्तिचिंतन ।
त्यासी ध्येय-ध्याता-उपचार-ध्यान । नसतेंच जाण कल्पित भासे ॥५१०॥
जेवीं धनलोभ्याचें हारपे धन । परी वासना न सांडी धनधान्य ।
धनातें आठवितां मन । धनलोभें पूर्ण पिसें होये ॥११॥
मन स्वयें जरी नव्हे धन । तरी धनकोश आठवी मन ।
तंव स्मृती वळघे वन । व्यामोहें पूर्ण पिसें होय ॥१२॥
तेवीं व्यामोहाचें पूर्ण भरित । मिथ्या भासे देहादि द्वैत ।
तें अहंभावें मानितां आप्त । भवभय निश्चित आदळे अंगीं ॥१३॥
भवभयाचें कारण । मनःकल्पना मुख्य जाण ।
त्या मनाचें करावया निरोधन । सद्गुरुवचननिजनिष्ठा ॥१४॥
हें जाणोनि सच्छिष्य ज्ञाते । गुरुवाक्यें विश्वासयुक्तें ।
विवेकवैराग्याचेनि हातें । निजमनातें आकळिती ॥१५॥
तेचि आकळती हातवटी । संक्षेपें राया सांगेन गोष्टी ।
सद्गुरुवाक्य परिपाटी । जे मनातें थापटी निजबोधें ॥१६॥
चंचळत्वें विषयध्यान । करितां देखे जें जें मन ।
तें तें होय ब्रह्मार्पण । सद्गुरुवचननिजनिष्ठा ॥१७॥
धरुनियां विषयस्वार्थु । मनें जो जो घेइजे अर्थु ।
तो तो होय परमार्थु । हा अनुग्रहो समर्थु गुरुकृपेचा ॥१८॥
जो भुईभेणें पळों जाये । तो जेथें पळे तेथें भू ये ।
मग येणेंजाणें स्वयें राहे । ठायीं ठाये पांगुळला ॥१९॥
तैसें मनासी लाविजे वर्म । जें जें देखे तेंचि ब्रह्म ।
जें जें करुं बैसे कर्म । तेथ पुरुषोत्तम स्वयें प्रगटे ॥५२०॥
एवं इंद्रियवृत्तिउल्लाळे । मोडिले गुरुवाक्यप्रतीतिबळें ।
निजाधिष्ठानमेळें । कळासलें येके वेळे अखंड कुलुप ॥२१॥
ऐसें नेमितां बाह्य कर्म । मनाचा मोडे द्वैतभ्रम ।
तंव बाह्य परब्रह्म । पूर्ण चिद्वोम कोंदाटे ॥२२॥
ऐसें भजनें मन नेमितां स्वयें । न रिघे कल्पांतकाळभये ।
भक्त होऊनियां निर्भयें । विचरती स्वयें निःशंक ॥२३॥
हे अगाध निष्ठा परिपूर्ण । भोळ्याभाळ्या न टके जाण ।
यालागीं सुगम साधन । सांगेन आन तें ऐक ॥२४॥;