श्लोक १७ वा
हंसस्वरूप्यवददच्युत आत्मयोगं दत्तः कुमार ऋषभो भगवान् पिता नः ।
विष्णुः शिवाय जगतां कलयाऽवतीर्णस्तेनाहृता मधुभिदा श्रुतयो हयास्ये ॥१७॥
सनकादिक ब्रह्मनंदन । तिहीं पित्यासी केला प्रश्र्न ।
प्रश्नखंडणमिसें जाण । केलें ब्रह्मज्ञान 'हंसावतारें' ॥८॥
नित्य स्मरतां हरीचें नाम । महाविघ्नें होतीं भस्म ।
त्याचे अवतारसंभ्रम । उत्तमोत्तम अवधारीं ॥९॥
ज्याचेनि नामें पळे कृतांतु । ज्याचेनि नामें जन्ममरणां घातु ।
तो अवतारु 'श्रीदत्तु' । मूर्तिमंतु परब्रह्म ॥२१०॥
नैष्ठिक ब्रह्मचारी निश्चितीं । ज्यासी स्वप्नीं नाहीं वीर्यच्युति ।
यालागीं 'कुमार' म्हणती । अवतारमूर्ति सनकादिक ॥११॥
आणि आमुचा जो कां पिता । 'ऋषभ' नारायण ज्ञाता ।
तोही अवतार नृपनाथा । जाण तत्त्वतां भगवन्मूर्ति ॥१२॥
इहीं नामीं-रूपीं संपूर्ण । अवतारीं अवतरे नारयण ।
जो जगाचा प्रतिपाळण । स्वांशें श्रीकृष्ण अवतरे ॥१३॥
तोचि स्वयें गा श्रीकृष्ण । मधुकैटभ निर्दाळून ।
नामें जो कां 'मधुसूदन' । तोचि अवतरून 'हयग्रीव' झाला ॥१४॥
तेणें शंख मर्दून पुढती । उद्धरिल्या बुडाल्या श्रुती ।
आणोनि दिधल्या ब्रह्ययाहातीं । जाण निश्चितीं वेदरक्षणा ॥१५॥