श्लोक २१ वा
श्रुतं च दृष्टवद् दुष्टं स्पर्धासूयात्ययव्ययैः ।
बह्वन्तरायकामत्वात् कृषिवच्चापि निष्फलम् ॥२१॥
जैसा देखिला हा लोक । तैसाचि श्रुत स्वर्गादिक ।
अनादि दोषयुक्त देख । सदोष मूर्ख वांछिती ॥९६॥
स्वर्गीं म्हणसी दोष कोण । ऐक तयांचें लक्षण ।
स्पर्धा असूया नाश जाण । तप क्षीण दिविभोगें ॥९७॥
तपसंपत्ति समान पाही । स्पर्धा मांडी त्याच्या ठायीं ।
मज समान भोगु पाही । तैं सुख नाहीं मानसीं ॥९८॥
आपणाहोनि अधिक पदीं । त्यासी दोष आरोपोनि निंदी ।
तेथही ऐसी विषमबुद्धी । सुख त्रिशुद्धी तेथें कैंचें ॥९९॥
यालागीं स्वर्गभोगें जें सुख । सकळां सारिखें नाहीं देख ।
तपानुसारें न्यूनाधिक । भोगिती लोक निजकर्में ॥५००॥
एक उर्वशी भोगूं लागला । एक काळी विद्रूप पावला ।
भोगें तपक्षयो झाला । नाशु आला अनिवार ॥१॥
जंव जंव स्वर्गभोग भोगिती । तंव तंव तपाची क्षीणशक्ती ।
तपक्षयें क्षया जाती । नाशु पावती स्वर्गस्थ ॥२॥
स्वर्गप्राप्तीचिये विधी । कर्में करितां विघ्न बाधी ।
तेणें नव्हे स्वर्गसिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥३॥
जें गर्भींच सटवलें । त्याचें बारसे न वचे केलें ।
तेवीं कर्मींचि विघ्न उद्भवलें । पावणें ठेलें स्वर्गाचें ॥४॥
म्हणसी विघ्न करी कोण । कर्म करितां होय विगुण ।
तें कर्मचि कर्मासि जाण । विघ्न दारुण उपजवी ॥५॥
कर्मचि कर्मासी साधक । कर्मचि कर्मासी बाधक ।
कर्मचि कर्मासी मोचक । हें नेणोनि लोक गुंतले ॥६॥
काम्य कर्मी विघ्न विचित्र । देश काळ मंत्र तंत्र ।
द्रव्य दक्षिणा विधि पात्र । शुद्धि सर्वत्र पाहिजे ॥७॥
जैसे क्षयरोगाचे रोगियासी । अल्प कुपथ्य बाधी त्यासी ।
तैसे जाण काम्य कर्मासी । अल्पदोषी सविघ्न ॥८॥
प्रचंड दुधाचें भांडें । माजीं थेंबु एकु कांजी पडे ।
तेणें दहीं दूध ना तूप जोडे । करी खवडे दुधाचे ॥९॥
तैसें काम्य कर्म जाण । अल्पही होतां विगुण ।
फळ नव्हे परी दारुण । तें कर्मचि विघ्न उपजवी ॥५१०॥
कष्टोनियां बारा मासीं । जैसा कृषीवळु करी कृषी ।
त्याच्या फलाआड विघ्नें कैशीं । केल्या कष्टासी नाशक ॥११॥
भूमि शुद्ध शुद्ध बीज । काळीं पर्जन्य कर्ता निरुज ।
उपकरण सामग्रीसमाज । पहिलें हें वोज पाहिजे ॥१२॥
पेरणी झालियापाठीं । देखणें राखणें कूपकांटी ।
सोंकरावें आवशीं पाहाटीं । आळसु पोटीं सांडूनी ॥१३॥
पीक येतयेतां कणशीं । आभाळें हिंसळा पडे त्यासी ।
कां कान्ही पडे पिकासी । घाली शेतासी निंदणें ॥१४॥
गर्वाचा तांबारा पडे । कां अहंतेचा रोग पडे ।
कीं अधर्माची आळी वाढे । पीक बुडें तेणेंही ॥१५॥
सबळ सोंकरणें न घडी । तरी आशेतृष्णेच्या भोरडी ।
कीजे पिकाची ओरबडी । दाणा बुडीं उरेना ॥१६॥
दंभाची घांटी पडिल्या ठायीं । घांटा दिसे परी दाणा नाहीं ।
कामक्रोधांच्या उंदरीं पाहीं । मूळाच्या ठायीं करांडिलें ॥१७॥
आल्या विकल्पाची धाडी । शेतामाजीं नुरे काडी ।
कुवासना टोळांची पडे उडी । समूळ सशेंडी खुराट ॥१८॥
एवं कृषीवळाचे परी । सकामासी विघ्नें भारी ।
फळ अंतरलें दूरी । विघ्नसागरीं बुडाले ॥१९॥
स्वर्ग एकु याज्ञिक बहुत । यागीं देव विघ्नें करित ।
मुख्य इंद्रचि विघ्ना प्रवर्तत । स्वर्ग राखत निजभोग ॥५२०॥
एकी वेश्या एकी राती । येथ सकाम बहुत येती ।
ते जैसे कलहो करिती । तैशी गती याज्ञिकां ॥२१॥
कां शुनि जैसी ऋतुस्त्नात । तिसी भोगूं येती श्वान बहुत ।
परस्परें गुरगुरित । तैसा स्वर्ग भोगत सकाम ॥२२॥
तेथ ज्यासी भोग घडे । भोगूं जातां अडकोनि पडे ।
भंडिमा होये जगापुढें । सज्ञान तोंडें थुंकिती ॥२३॥
जिचें भोगूं जाय सुख । अडकल्या ते होय विमुख ।
मैथुनद्वारें गुंतल्या देख । थुंकिती लोक मुखामुखीं ॥२४॥
तैशी याज्ञिकां स्वर्गप्राप्ती । भोगें होय तपच्युति ।
स्वर्गभोगीं गुंतली आसक्ती । विमुख पडती इहलोकीं ॥२५॥
एवं कृषीवळाचिया परी । स्वर्गप्राप्तीसी विघ्नें भारी ।
केले कष्ट वृथा करी । भोगु कैशापरी घडेल ॥२६॥
एक म्हणती कर्मकुशळ । आम्ही कर्म हो नेदूं विकळ ।
अच्छिद्र साधूनि सकळ । स्वर्गसुखफळ भोगूं ॥२७॥
उद्धवा ऐसेंही न घडे । तें मी सांगेन तुज पुढें ।
पंचश्लोकीं फाडोवाडें । विशद निवाडें परियेसीं ॥२८॥