श्लोक १७ वा
राजोवाच-यथैतामैश्वरीं मायां दुस्तरामकृतात्मभिः ।
तरन्त्यञ्जः स्थूलधियो महर्ष इदमुच्यताम् ॥१७॥
अतिदुस्तर हरीची माया । आइकोनि हांसें आलें राया ।
लटकीच परी देहाभिमानियां । बाधावया दृढ जाहली ॥२३॥
माया दुस्तर शास्त्रप्रसिद्धी । तेथ बाळेभोळे स्थूळबुद्धी ।
सुखें तरती कोणे विधीं । तो सांग त्रिशुद्धी उपावो ॥२४॥
ज्यासी वश्य नाहीं निजमन । आणि भवाब्धि तरावया भाव पूर्ण ।
ऐसे भोळे भाविक जन । त्यांसी मायातरण सुगम सांगा ॥२५॥
मागां कवी बोलिला संकलितीं । ’तन्माययाऽतो बुध आभजेति’ ।
गुरु-ब्रह्म अभेदस्थिती । करितां भक्ती माया तरिजे ॥२६॥
तें भक्तीचें स्पष्ट लक्षण । विशद होआवया श्रवण ।
पुढती मायेचें तरण । पुसावया कारण मुख्य हेंचि ॥२७॥
तो मायातरणोपायविधी । सुगम सांगावया त्रिशुद्धी ।
अंतरिक्षाधाकुटा सुबुद्धी । ’प्रबुद्ध’ प्रज्ञानिधी बोलता जाहला ॥२८॥;