श्लोक २९ वा
एष सांख्यविधिः प्रोक्तः संशयग्रन्थिभेदनः ।
प्रतिलोमानुलोमाभ्यां परावरदृशा मया ॥२९॥
मी विवेकाचा विवेकू । मी अर्काचा आदिअर्कू ।
मी ज्ञानियांचा ज्ञानतिलकू । त्या माझा परिपाकू तें हें सांख्य ॥५९०॥
मी वेदांचा आदिवेदू । मी बोधाचा आदिबोधू ।
मी आनंदाचा निजानंदू । त्या माझा प्रबोधू तें हें सांख्य ॥९१॥
तेणें म्यां सर्वज्ञें श्रीकृष्णें । निर्धारोनि निजज्ञानें ।
सांख्ययोगउपलक्षणें । ब्रह्म अव्ययपणें दाविलें ॥९२॥
जेवीं गरगरीत वाटोळा । करतळीं दिसे आंवळा ।
तेवीं सांख्ययोगलीळा । ब्रह्म तुज डोळां दाविलें ॥९३॥
जो ब्रह्म डोळां देखों जाये । तो सर्वांगें देखणा होये ।
ऐशी सांख्यज्ञाननिजसोये । तुज म्यां पाहें दाविली ॥९४॥
हा सांख्ययोगअनुक्रम । अन्वयव्यतिरेकें उपक्रम ।
आलोडितां आकळे वर्म । अखंड ब्रह्म अद्वय ॥९५॥
उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । ब्रह्म अखंड निज नित्य ।
हेंचि सांख्ययोगें प्राप्त । जाण निश्चित साधकां ॥९६॥
ज्यांसी ब्रह्मज्ञानाचें कोड । ते सांख्ययोग पुरवी चाड ।
लिंगदेहाचें सुदृढ झाड । त्याचें समूळ बूड उन्मळी ॥९७॥
लिंगदेह अत्यंत कठिण । तें सांख्ययोगापुढें जाण ।
जेवीं अग्नीमाजीं तृण । तेवीं होय संपूर्ण भस्मांत ॥९८॥
लिंगदेह सैंधवगिरिवर । सांख्य अत्यंत प्रळयसागर ।
खवळला विरवूनि करी नीर । एकाकार निजात्मता ॥९९॥
खवळल्या अत्यंत चित्सागरा । नाना संशयजळगारा ।
उरावया नाहीं थारा । निजनिर्धारा उद्धवा ॥६००॥
सकळ संशयांचें छेदन । लिंगदेहाचें भेदन ।
करी तें सांख्ययोगज्ञान । उद्धवा जाण निश्चित ॥१॥
अनुलोम प्रतिलोम । विवंचना वाटेल दुर्गम ।
हें न करितां सांख्य सुगम । आकळे तें वर्म सांगेन ऐक ॥२॥
सांडूनि आकारविषमता । सर्व भूतीं भगवंतता ।
जो पाहे सद्भावता । सांख्य त्याचे हाता समूळ आलें ॥३॥
कां जैसें होईल कर्माचरण । तैसें सुखेंचि हो आपण ।
मी कर्ता हें तूं न म्हण । इतुकेन ब्रह्म पूर्ण तूं होसी ॥४॥
याहीवरती सुगमता । मज दिसेना सर्वथा ।
उद्धवा तुझे निजहितार्था । जाण तत्त्वतां सांगीतलें ॥५॥
हेंचि एक माझें वचन । विचारुनियां संपूर्ण ।
निजहितार्थ आपण । अवश्य जाण करावें ॥६॥;
ऐसें बोलिला देवाधिदेवो । तेथ जडला उद्धवाचा भावो ।
निःशेष ’अहं’ सांडितां पहा हो । ब्रह्म स्वयमेवो सहजचि ॥७॥
विचारितां सांख्यज्ञान । जगातें गोंवी अहंपण ।
अहंपाशीं जन्ममरण । दुःख दारुण अहंभावीं ॥८॥
ऐसा अहंभावो कठिण । सांडितां न सांडे आपण ।
येचि गुंतीचें कारण । सर्वथा जाण कळेना ॥९॥
हें पुसों जावें देवापाशीं । तेणें विशद सांगीतलें सांख्यासी ।
आतां आपुली गुंती आपल्यापाशीं । तेंचि आम्हासी कळेना ॥६१०॥
येचि अर्थी श्रीकृष्ण । पंचविसावे अध्यायीं जाण ।
सगुण-निर्गुणविभागें पूर्ण । गोड निरुपण सांगेल ॥११॥
ते सुरस रसाळ मधुर कथा । जेथ श्रीकृष्णाऐसा वक्ता ।
उद्धव शिरोमणि श्रोता । अनुपम स्वादुता ते ठायीं ॥१२॥
त्या स्वादाचें गोडपण। सांगावया समर्थ श्रीकृष्ण ।
सेवावया श्रोता अतिसज्ञान । निजभक्त जाण उद्धव ॥१३॥
ते देवभक्तसंवादगोडी । वेदशास्त्रें न जोडे जोडी ।
आलोडितां ग्रंथकोडी । ते निजगोडी नातुडे ॥१४॥
आतुडावया ते निजगोडी । जैं भाग्यें भावार्थें जोडे जोडी ।
भावार्थाचे निजआवडीं । जिव्हारींची गोडी देवो दे भक्तां ॥१५॥
एवं भावार्थापरतें कांहीं । देवासी आवडतें नाहीं ।
तो भावो नाहीं ज्यांचे ठायीं । ते मूर्ख पाहीं बालिश ॥१६॥
त्या बाळकांचा धन्य भावो । खापरें मांडूनि म्हणती देवो ।
तेथही प्रकटे देवाधिदेवो । धरिल्या निःसंदेहो विश्वास ॥१७॥
बाळकें दूध मागावयासाठीं । भावार्थें लागला देवापाठीं ।
कां क्षीराब्धि करुनि वाटी । उपमन्यावोठीं लाविली ॥१८॥
एवं भाविकू देवाचा लाहणा । देवो भाविकांचा आंदणा ।
भावेंवीण देवो जाणा । कधीं कोणा न भेटे ॥१९॥
यालागीं जेथ भावार्थ । तेथचि जोडे सुखस्वार्थ ।
भावार्थ तेथ परमार्थ । साङग साद्यंत सांपडे ॥६२०॥
ऐसा वाढविल्या भावार्थ । तेणें जोडे निर्गुणनिजस्वार्थ ।
तेचि अर्थीचा वृत्तांत । पुढिल्या अध्यायांत हरि सांगे ॥२१॥
ते कथेचें गोडपण । अमृतास विसरवी जाण ।
ऐसें रसाळ निरुपण । सादरें श्रीकृष्ण सांगेल ॥२२॥
तें श्रीकृष्णकथापीयूख । श्रोत्यांचें पावे श्रवणमुख ।
एका जनार्दनीं अतिसुख । सकौतुक व्याख्यान ॥२३॥
श्रीभागवत अत्यादरें । श्रीकृष्णकथा सविस्तरें ।
अहेर विस्तारिले साजिरे । परमार्थअळंकारें साळंकृत ॥२४॥
तेणें संत सज्जन सोयरे । गौरवीन श्रवणादरें ।
एका जनार्दनकृपाकरें । आविष्करे सामर्थ्य ॥२५॥
गौरविले सोयरे सज्जन । म्हणाल उपेक्षिले इतर जन ।
जो श्रीभागवतीं सावधान । तो परमार्थें जाण गौरवे ॥२६॥
भावार्थासारिखें गौरवण । एका जनार्दन जाणे जाण ।
एका जनार्दना शरण । आपण्या आपण गौरवी ॥६२७॥
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
एकाकारटीकायां प्रकृतिपुरुषसांख्ययोगो नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः ॥२४॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
चोविसावा अध्याय समाप्त.