आरंभ
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु मूर्ती । चराचर तुझी विभूती ।
विश्वात्मा विश्वस्फूर्ती । अमूर्तमूर्ती श्रीगुरुराया ॥१॥
तुझे मूर्तीचे महिमान । सकळ शास्त्रां अतर्क्य जाण ।
श्रुतीने घेतलें मौन । शब्दें आण वाहिली ॥२॥
आण वाहिली दृष्टांती । तुजसमान नाही दुजी स्थिती ।
जे जे योजावी उपपत्ती । ते ते विभूती पैं तुझी । ३॥
तुझिया प्रभावाची ऐशी खोडी । जे दुजेपणाचें मूळ तोडी ।
मग एकपणाचे परवडी । दृष्टांत काढी कोण कोठें ॥४॥
कोठें तुझे स्थानमान । हेंच सर्वथा न कळे जाण ।
अगाध तुझें महिमान । कैसेनि ध्यान करावें ॥५॥
हेतु मातु दृष्टांतू । न रिघे ज्यांचे शिंवे आंतू ।
तो भागवतींचा भागवतार्थू । ओंवियांआंतू बोलविशी ॥६॥
ते माझे मर्हाटे आरुष बोल । सद्गुरूंनी केले सखोल ।
तेथींच्या प्रेमाचे जे बोल । जाणती केवळ गुरुभक्त ॥७॥
ज्यासी नाहीं गुरुचरणीं भक्ती । त्यासी कैसेनि होईल विरक्ती ।
जरी पढले श्रुतिस्मृती । शास्त्रव्युत्पत्ती केल्याही ॥८॥
करितां साधनांच्या कोटी । साधनीं समाधान नुठी ।
झालिया सद्गुरुकृपादृष्टी । ब्रह्मत्वें पुष्टी गुरुभक्तां ॥९॥
तो तूं सद्गुरु श्रीजनार्दन । सकळ जगाचें अधिष्टान ।
भूतीं भूतात्मा तूं आपण । सहजें जाण समसाम्यें ॥१०॥
समसाम्य सर्व भूतीं । ज्यांसी घडे सद्गुरुभक्ती ।
तेचि ये श्रीमहाभागवतीं । अर्थप्राप्ती प्रविष्ट ॥११॥
झालिया सद्गुरुकृपा वरिष्ठ । न करितां व्युत्पत्तीचे कष्ट ।
भागवतार्थीं होय प्रविष्ट । भक्त सुभट भावार्थीं ॥१२॥
हृदयीं झालिया सद्भावो । भावें प्रकटे देवाधिदेवो ।
तेथें भागवताचा अभिप्रावो । सहजेंचि पहा वो ठसावे ॥१३॥
यालागीं करितां गुरुभक्ती । प्राप्त होईजे भागवतार्थीं ।
तेथ काव्यादि व्युत्पत्ती । नाना युक्ती किमर्थ ॥१४॥
किमर्थ करावें शास्त्र ज्ञान । किमर्थ धरावें वृथा ध्यान ।
चालतें बोलतें ब्रह्म पूर्ण । सद्गुरुचरण साधकां ॥१५॥
वांचूनिया गुरुभजन । शिष्यासी नोहे समाधान ।
याहूनियां श्रेष्ठ साधन । नाहीं जाण सर्वथा ॥१६॥
त्या सद्गुरुकृपापरिपाटी । एकादशीं पूर्वार्ध कोटी ।
वाखाणिली की मर्हाटी । यथार्थदृष्टीं निजबोधें ॥१७॥
ऊंस गाळितां रस होये । तो ठेविलिया बहुकाळ न राहे ।
त्याचा आळूनियां पाहे । गूळ होये सपिंड ॥१८॥
तोहि ठेवितां लिवाड धरी । मग साखर कीजे रायपुरी ।
तेही घोटूनियां चतुरीं । नाबद करिजे कोरडी ॥१९॥
तैसें हे श्रीभागवत जाण । मुळीं बोलिला नारायण ।
तेंचि श्रीव्यासें आपण । दशलक्षण वर्णिले ॥२०॥
ते दशलक्षण परवडी । श्रीशुकमुखें चढली गोडी ।
तेथील कठिण पदबंधमोडी । टीका चोखडी श्रीधरी ॥२१॥
ते श्रीधरीचें व्याख्यान । भावार्थदीपिका जाण ।
त्या भावार्थाची सद्भाव खूण । केलें निरूपण देशभाषा ॥२२॥
मुळीं वक्ता एक नारायण । व्यास शुक श्रीधरव्याख्यान ।
त्यांत मुळींचे लक्षूनि गोडपण । एका जनार्दन कविकर्ता ॥२३॥
मुळीं बीज श्रीनारायण । ब्रह्मयाचे ठायीं प्रेरिलें जाण ।
तें नारदक्षेत्रीं संपूर्ण । पीक परिपूर्ण निडारिलें ॥२४॥
त्याचें व्यासें दशलक्षण । संपूर्ण केलें संवगण ।
शुकें परीक्षितीच्या खळां जाण । मळूनि निजकण काढिले ॥२५॥
तेंचि शास्त्रार्थें जाण । श्रीधरें निजबुद्धीं पाखडून ।
काढिले निडाराचे कण । अतिसघन सुटंक ॥२६॥
त्याची पक्वान्नें चोखडी । मर्हाटिया पदमोडी ।
एका जनार्दनें केली परवडी । ते जाणती गोडी निजात्मभक्त ॥२७॥
त्या श्रोत्यांचेनि अवधानें । जनार्दनकृपा सावधानें ।
पूर्वार्ध एका जनार्दनें । संपूर्ण करणें देशभाषा ॥२८॥
ते प्रथमाध्यायीं अनुक्रम । वैराग्य उत्पत्तीचा संभ्रम ।
कुलक्षयासी पुरुषोत्तम । करी उपक्रम ब्रह्मशापें ॥२९॥
दुसर्यापासूनि चतुर्थवरी । नारदें वासुदेवाच्या घरीं ।
निमिजायंत प्रश्नोत्तरीं । पंचाध्यायी खरी संपविली ॥३०॥
षष्ठाध्यायी श्री कृष्णमूर्ती । पाहो आलिया सुरवरपंक्ती ।
तिहीं प्रर्थिला श्रीपती । निजधामाप्रती यावया ॥३१॥
ऐकोनि सुरवरांची विनंती । देखोनि अरिष्टभूत द्वारावतीं ।
उद्धवें प्रार्थिला श्रीपती । निजधामाप्रती मज नेईं ॥३२॥
त्याचे प्रश्नांचे प्रश्नोत्तर । त्यागयुक्त ज्ञानगंभीर ।
सप्तमाध्यायीं शारङ्गधर । थोडेनि फार बोलिला ॥३३॥
तेथ त्यागसंग्रह लक्षण । यदुअवधूत संवादें जाण ।
चोविसां गुरूंचे प्रकरण । केलें संपूर्ण अष्टमीं नवमीं ॥३४॥
श्राद्धासंपन्न ज्ञानविश्वास । तेथ नाना मतांचा मतनिरास ।
दशमाध्यायी हृषीकेश । ज्ञानविलास बोलिला ॥३५॥
अकरावें अध्यायीं जाण । बद्धमुक्तांचे वैलक्षण्य ।
सांगूनि साधूचे लक्षण । भक्तीचे संपूर्ण दाविलें रूप ॥३६॥
भागवतीं बारावा अध्यावो । अतिगुह्य बोलिला देवो ।
तेथील लावितां अभिप्रावो । पडे संदेहो सज्ञाना ॥३७॥
बारावे अध्यायाची किल्ली । युक्तिप्रयुक्ती नातुडें बोली ।
जनार्दन कृपा माऊली । तेणें मागी दाविली ग्रंथाची ॥३८॥
तें द्वादशाध्यायी निरूपण । सत्संगाचा महिमा गहन ।
कर्माचा कर्ता कोण । त्यागितें लक्षण कर्माचें ॥३९॥
तो द्वादशाध्यावो ऐकतां । ज्ञानसंलग्नता होय चित्ता ।
आडवी ठाके विषयावस्था । तेणें बाधकता साधकां ॥४०॥
गुणवैषम्याचें लक्षण । तेणें विषयावस्था गहन ।
तेथ सत्त्वशुद्धीचें कारण । केले निरूपण त्रयोदशीं ॥४१॥
तेचि प्रसंगे यथोचित । चित्तविषयांचे जें प्रथित ।
उगवावया हंसगीत । सुनिश्चित सांगितलें ॥४२॥
हंसगीतीं जे निरूपण ज्ञान । समाधिपर्यंत समाधान ।
तेंचि साधावया साधन । चवदावा आपण बोलिला देवो ॥४३॥
साधनांमाजी मुख्य भक्ती । सगुण तेचि माझी निर्गुण मूर्ती ।
योगयुक्त ध्यानस्थिती । बोलिला श्रीपती चतुर्दशीं ॥४४॥
विविधा सिद्धींची धारणास्थिती । देवें सांगितली उद्धवाप्रती ।
सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । हें पंधराव्याअंती निरूपिलें ॥४५॥
एवं पंधराव्या अध्यायी पूर्वार्ध । निरूपण झाले अतिशुद्ध ।
आतां उरलें उत्तरार्ध । तो कथासंबंध अवधारा ॥४६॥
षोडशीं भगवद्विभूती । सतरा अठरा अध्यायांप्रती ।
वर्णाश्रम कर्मगती । विधानस्थिती निरूपण ॥४७॥
एकुणिसावा अध्याय गहन । ज्ञाननिर्णयाचें महिमान ।
उद्धवाचें यमनियमादि प्रश्न । सांगितलें ज्ञानपरिपाकें ॥४८॥
त्या ज्ञानाधिकाराचा योग । अज्ञान ज्ञान मध्यस्थ भाग ।
विसावें अध्यायी श्रीरंग । त्रिविध विभाग बोलिला ॥४९॥
तेथ गुणदोषांची अवस्था । उद्धवें ठेविली वेदांचे माथां ।
ते वेदवादसंस्था । केली तत्त्वतां एकविसांत । ॥५०॥
तेचि वेदवाद व्युत्पत्ती । तत्त्वांची संख्या किती ।
ते तत्त्वसंख्या उपपत्ती । केली श्रीपती यथान्वयें ॥५१॥
सकळ तत्त्वांचे विवेचन । प्रकृतिपुरुषांचे लक्षण ।
जन्ममरणांचें प्रकरण । केलें निरूपण बाविसावां ॥५२॥
साहोनियां परापराध । स्वयें राहावें निर्द्वंद्व ।
हा भिक्षुगीतसंवाद । केला विशद तेविसांवा ॥५३॥
अद्वैती राहावया स्थिती । चोविसावां सांख्यव्युत्पत्ती ।
निर्गुणापासोनि गुणोत्पत्ती । गुणक्षया अंती निर्गुण उरे ॥५४॥
आदीं निर्गुण अंतीं निर्गुण । मध्यें भासले मिथ्या गुण ।
ये अद्वैतप्राप्तीलागीं जाण । केलें निरूपण सांख्याचें ॥५५॥
ते मिथ्यागुण प्रवृत्तियुक्त । त्रिगुणांचा सन्निपात ।
बोलिला पंचविसाव्यांत । निर्गुणोक्त निजनिष्ठा ॥५६॥
सव्विसावे अध्यायाप्रती । अनिवार अनुतापाची शक्ती ।
भोगितां उर्वशी कामप्राप्तीं । पावला विरक्ती पुरूरवा ॥५७॥
भजनक्रिया मूर्तिलक्षण । वैदिक तांत्रिक मिश्र भजन ।
या उद्धवप्रश्नांचे निरूपण । केलें संपूर्ण सत्ताविसावां ॥५८॥
महायोग्यांचे योगभांडार । परम ज्ञानें ज्ञानगंभीर ।
निजसुखाचें सुखसार । केवळ चिन्मात्र अठ्ठाविसावा ॥५९॥
त्याचि अध्यायामाजीं जाण । संसार असंभवाचा प्रश्न ।
उद्धवें केला अतिगहन । त्याचेंही प्रतिवचन दिधले देवें ॥६०॥
एकादशाचा निजकळसू । भक्तिप्रेमाचे अतिविलासू ।
एकुणतिसावां सुरसरसू । ज्ञानोपदेशू भक्तियुक्त ॥६१॥
पुढिले दों अध्यायांआंत । स्त्रीपुत्रादि कुळाचा घात ।
होतां डंडळीना ज्ञानसमर्थ । तें प्रत्यक्षभूत हरि दावी ॥६२॥
ब्राह्मणांचा शाप कठिण । शापें बाधिला श्रीकृष्ण ।
इतरांची कथा कोण । कुळनिर्दळण ब्रह्मशापे ॥६३॥
ब्राह्मणांचा कोप समर्थ । सगळा समुद्र केला मूत ।
शिवाचा झाला लिंगपात । ब्रह्मक्षोभांत निमेषार्धे ॥६४॥
यालागीं सज्ञान अथवा मुग्ध । तिहीं न करावा ब्रह्मविरोध ।
हेंचि दावावया मुकुंद । कुलक्षयो प्रसिद्ध दाखवी ॥६५॥
निजदेहासी जो करी घात । तो जराव्याध केला मुक्त ।
येथवरी ज्ञाता देहातीत । क्षमायुक्त तो सज्ञान ॥६६॥
एकुणतीस अध्यायापर्यंत । कृष्णें उपदेशिला ज्ञानार्थ ।
पुढील दोन अध्यायांत । स्वयें दावीत विदेहत्व ॥६७॥
राम अयोध्या घेऊन गेला । कृष्णें निजदेहही सांडिला ।
येणें देहाभिमान मिथ्या केला । तरावया पुढिलां मुमुक्षां ॥६८॥
पंधरा अध्याय पूर्वार्ध । व्याख्यान झालें अतिशुद्ध ।
सूत्रप्राय उत्तरार्ध । दाविले विशद अध्यायार्थ ॥६९॥
साह्य सद्गुरु जनार्दन । श्रोतीं द्यावें अवधान ।
पुढील उत्तरार्ध व्याख्यान । एका जनार्दन बोलवी ॥७०॥
झालिया वसंताचे रिगवणें । वृक्ष सपुष्प सफळ तेणें ।
तेवीं जनार्दनकृपागुणें । सार्थक वचनें कवित्वाचीं ॥७१॥
गगनीं उगवला अंशुमाळी । जेवीं विकासिजे नवकमळीं ।
तेवीं जनार्दनकृपामेळीं । कवित्ववनमाळी विकासे ॥७२॥
वेणु घेऊनियां हातें । विश्वा मोहिलें कृष्णनाथें ।
तेवीं कवीश्वर करोनि मातें । वक्ता येथें जनार्दन ॥७३॥
तो जनार्दनकृपाक्षीराब्धी । ज्याची कृपेसी नाहीं अवधी ।
तेणें उत्तरार्धीं प्रवेशे बुद्धी । अर्थसिद्धीसमवेत ॥७४॥
मागील कथासंगती । पंधरावे अध्यायाअंती ।
सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । ऐसें श्रीपती बोलिला ॥७५॥
एवं सांडूनि सिद्धींचें ध्यान । माझे स्वरूपीं राखावें मन ।
हें ऐकोनि कृष्णवचन । उद्धवें प्रश्न मांडिला ॥७६॥
उद्धव म्हणे श्रीकृष्णनाथा । विनंती अवधारीं समर्था ।
तुझ्या विभूति समस्ता । मज तत्त्वतां सांगाव्या ॥७७॥