श्लोक ७ वा
दिवि दुन्दुभयो नेदुः, पेतुः सुमनसश्च खात् ।
सत्यं धर्मो धृतिर्भूमेः कीर्तिः श्रीश्चानु तं ययुः ॥७॥
उल्हासले सुरगण । दिवि दुंदुभि त्राहाटिल्या जाण ।
दिव्य सुमनें गगनींहून । वर्षले पूर्ण श्रीकृष्णावरी ॥७१॥
वैकुंठादि स्वर्ग संपत्ती । भूलोका आणिल्या श्रीपतीं ।
तो येतां निजधामाप्रति । आमुच्या आम्हां हातीं देईल वेगीं ॥७२॥
ऐसेनि देव उल्हासोनि । पुनः पुनः वर्षती सुमनीं ।
शिवादि पाहती सावधानीं । अतर्क्य गमनीं हरि गेला ॥७३॥
आम्ही सकळ मायेचे नियंते । आम्ही सर्वद्रष्टे सर्वज्ञाते ।
ऐसा अभिमान होता देवांतें । त्यांसी श्रीकृष्णनाथें लाजविलें ॥७४॥
अलक्ष्य श्रीकृष्णाची निजगती । शंभु स्वयंभू स्वयें नेणती ।
तेणें विस्मित ते होती । आश्चर्य मानिती सुरवर ॥७५॥
देव परमाश्चर्य जंव मानिती । तंव सत्य-धर्म-श्री-धृति-कीर्ती ।
श्रीये समवेत निघती । सांडूनि क्षिती कृष्णलक्षीं ॥७६॥
सत्य-धर्म-श्री-धृति कीर्ती । यांची श्रीकृष्णचरणीं नित्य वस्ती ।
यालागीं कृष्णासवें त्याही निघती । सांडोनि क्षिती तत्काळ ॥७७॥
तूं ऐसें मानिशी परीक्षिती । जे सत्य धर्म श्री धृति कीर्ती ।
निःशेष सांडूनि गेलीं क्षिती । ऐक ते अर्थीं विचार ॥७८॥
मज पाहतां श्रीकृष्णमूर्ती । स्थिरावली ज्याचे चित्तीं ।
तेथ सत्य धर्म श्री धृति कीर्ती । साम्राज्यें वसती कुरुराया ॥७९॥
केवळ भक्तानुग्रही । कृष्ण स्वयें लीलाविग्रही ।
त्या कृष्णाची गती पाहीं । न पडे ठायीं ब्रह्मादिकां ॥८०॥