श्लोक ५ वा
तमो रजः सत्त्वमिति प्रकृतेरभवन्गुणाः ।
मया प्रक्षोभ्यमाणायाः पुरुषानुमतेन च ॥५॥
प्रकृति गुणमयी पूर्ण । ते लाहोनि पुरुशईक्षण ।
प्रकट करी तिन्ही गुण । तेंचि निरुपण हरि सांगे ॥३॥
जेवीं सूर्यावलोकनमेळीं । कळी विकासे कमळदळीं ।
ते वेगळवेगळी पांकोळी । होती मूळीं कळिकेमाजीं ॥४॥
तेवीं पुरुषाच्या ईक्षणीं । गुणमयी झाली गुर्विणी ।
ते तम-रज-सत्त्वगुणी । प्रसवली तिनी गुणांतें ॥५॥
जेवीं जळें बीज क्षोभूनी । दोनी दळें उलवूनी ।
डिरु निघाला त्यांतूनी । तरतरुनी तिवणा पैं ॥६॥
तेवीं परमात्मा मी आपण । पुरुषत्वातें पावोनि जाण ।
प्रकृति क्षोभवूनी पूर्ण । तिनी गुण प्रकटविले ॥७॥
जेवीं कां सूर्याचे किरणीं । सूर्यकांतीं पडे अग्नी ।
तेवीं पुरुषें प्रकृति भोगुनी । गुण तिनी ते प्रसवे ॥८॥