श्लोक ३४ व ३५ वा
निःसङगो मां भजेद्विद्वानप्रमत्तो जितेन्द्रिय ॥३४॥
रजस्तमश्चाभिजयेत्सत्त्वसंसेवया मुनिः ।
सत्त्वं चाभिजयेद्युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः ॥३५॥
करुनि विषयांची विरक्ती । हृदयीं नापेक्षावी मुक्ती ।
ऐशी निरपेक्ष माझी भक्ती । वाढत्या प्रीतीं करावी ॥२६॥
तेणें अनिवार सत्वशुद्धी । सर्व भूतीं भगवद्बुद्धी ।
दृढ वाढे गा त्रिशुद्धी । हे भजनसिद्धी साधकां ॥२७॥
ऐसें करितां माझें भजन । विस्मरणासी ये मरण ।
सर्वेंद्रियीं सावधपण । सहजें जाण ठसावे ॥२८॥
तेव्हां रज तम दोनी गुण । निःशेष जाती हारपोन ।
शुद्धसत्वाचें स्फुरण । तेणें स्वानंद पूर्ण साधकां ॥२९॥
केवळ उरल्या सत्वगुण । साधका ऐसें स्फुरे स्फुरण ।
जगामाजीं एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥४३०॥
मी पावलों शुद्ध बोध । मज प्रकटला परमानंद ।
ऐसा सुखाचा जो स्फुंद । तो सत्वबोध साधकां ॥३१॥
ऐसा उरला जो सत्वगुण । तो निवारावया साधन कोण ।
मी स्वयें सुखस्वरुप आपण । मज सुखाचें स्फुरण ते माया ॥३२॥
गूळ गुळा गोडपणें पांगे । कीं दुधा दूढ गोड लागे ।
तैसा सुखरुप मी सर्वांगें । वृथा सुखभोगें कां फुंजें ॥३३॥
ऐशी साधकीं स्फूर्ति स्फुरे । तंव सत्वगुण स्वरुपीं विरे ।
तेव्हां सुखाचाही फुंद सरे । निजसुख उरे निजशांती ॥३४॥
ऐसे निवारल्या तिनी गुण । केवळ उरे निर्गुण ।
तेचि अर्थींचें निरुपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥३५॥