श्लोक २४ वा
पार्ष्ण्यापीड्य गुदं प्राणं हृदुरःकण्ठमूर्धसु ।
आरोप्य ब्रह्मरन्ध्रेण ब्रह्म नीत्वोत्सृजेत्तनुम् ॥२४॥
देहत्यागाचें प्राणधारण । तेंच स्वच्छंदमृत्यूचें लक्षण ।
तदर्थी जें प्राणोत्क्रमण । तें योगधारण अवधारीं ॥१३०॥
मूळाधारीं वामचरण । टांचेचेनि नेटें जाण ।
अपानाचें अधोगमन । गुद पीडून राखावें ॥३१॥
हृदयीं विचरता जो प्राण । त्याचें सदा ऊर्ध्व गमन ।
तो प्राणायामें आवरून । अधोमुख जाण करावा ॥३२॥
अपानाचें ऊर्ध्व गमन । स्वाधिष्ठानपर्यंत जाण ।
प्राणाचें अधःसंचरण । तेचि चक्रीं जाण जैं घडे ॥३३॥
तेथ प्राणापानांची बुझावण । त्या चक्रामाजीं करी समान ।
ऐक्ये पडिलें आलिंगन । एकात्मता जाण चालिले ॥३४॥
सांडोनि अपानाची अधोवाट । प्राणें त्यजिला हृदयकंठ ।
फोडूनि सुषुम्नेचें कपाट । ऊर्ध्व मुखें नीट चालिले ॥३५॥
जिणतां सुषुम्नेचें घर । भेदिले साही चक्रांचे पदर ।
उघडूनि काकीमुखाचें द्वार । ब्रह्मरंध्र ठाकिलें ॥३६॥
तेथें पावल्या यथानिगुतीं । या देहाची सांडूनि स्थिती ।
जो कामभोग वाहे चित्तीं । त्या देहाची प्राप्ती तो पावे ॥३७॥
वैकुंण्ठ कैलास अमरावती । सार्वभौम चक्रवर्ती ।
जे कामना कामि चित्तीं । ते पावे गती तत्काळ ॥३८॥
जरी तो ब्रह्मसायुज्यता वाहे । तरी सांडूनि देहाची सोये ।
शुद्धधारणा पाहे । तो ब्रह्मचि होये स्वतःसिद्ध ॥३९॥
यापरी प्राणधारण । करूनि निवर्ते जो जाण ।
तें स्वच्छंदमृत्यूचें लक्षण । त्याआधीन कळिकाळ ॥१४०॥