श्लोक १८ वा
स भुक्तभोगां त्यक्त्वेमां निर्गतस्तपसा हरिम् ।
उपासीनस्तत्पदवीं लेभे वै जन्मभिस्त्रिभिः ॥१८॥
तेणें दिग्मंडल जिंतिलें । समुद्रवलयांकित राज्य केलें ।
नानाविध भोग भोगिले । जे नाहीं देखिले सुरवरीं ॥४९॥
अनुकूळ स्त्रिया पुत्र । अनुकूळ मंत्री पवित्र ।
अनुकूळ राज्य सर्वत्र । ते त्यागिले विचित्र नानाभोग ॥१५०॥
ऐसे भोग भोगिलियापाठीं । सांडूनि वलयांकित राज्यसृष्टी ।
स्वयें निघाला जगजेठी । स्वहितदृष्टी हरिभजनीं ॥५१॥
जे राज्यवैभव भोगिती । त्यांसी कदा नव्हे गा विरक्ती ।
भरतें केली नवलख्याती । सेविला श्रीपती भोगत्यागें ॥५२॥;
तो तेणेंचि जन्में जाण । होआवा मोक्षासी आरोहण ।
परी जाहलें जन्मांतरकारण । तेंही विंदाण सांगेन ॥५३॥
संनिहितप्रसूतिकाळीं । मृगी जळ प्राशितां जळीं ।
ऐकोनि पंचाननाची आरोळी । उडालि तत्काळीं अतिसत्राणें ॥५४॥
धाकें गर्भु तिचा पडतां जळीं । भरत स्नान करी ते काळीं ।
देखोनि कृपाळु कळवळी । काढी तत्काळीं दयाळुत्वें ॥५५॥
मृगी न येचि परतोन । मातृहीन हें अतिदीन ।
भरत पाळी भूतदयेनें । मृगममता पूर्ण वाढली ॥५६॥
स्नान संध्या अनुष्ठान । करितां मृग आठवे क्षणक्षण ।
आरंभिल्या जपध्यान । मृगमय मन भरताचें ॥५७॥
आसनीं भोजनीं शयनीं । मृग आठवे क्षणक्षणीं ।
मृग न देखतां नयनीं । उठे गजबजोनि ध्यानत्यागें ॥५८॥
ममता बैसली मृगापाशीं । मृग वना गेला स्वइच्छेंसीं ।
त्याचा खेदु करितां भरतासी । काळ आकर्षी देहातें ॥५९॥
यालागीं साचचि जाण । ममतेपाशीं असे मरण ।
जो निर्मम संपूर्ण । त्यासि जन्ममरण स्पर्शेना ॥१६०॥
भरत तपिया थोर अंगें । तेथ काळ कैसेनि रिघे ।
ममतासंधी पाहोनि वेगें । मृत्यु तद्योगें पावला ॥६१॥
देहासी येतां मरण । भरतासी मृगाचें ध्यान ।
तेणें मृगजन्म पावे आपण । जन्मांतरकारण जाहलें ऐसें ॥६२॥
कृपेनें केला जो संगु । तोचि योगियां योगभंगु ।
यालागीं जो निःसंगु । तो अभंगु साधक ॥६३॥
मृगाचेनि स्मरणें निमाला । यालागीं तो मृगजन्म पावला ॥
जो कृष्णस्मरणें निमाला । तो कृष्णुचि जाला देहांतीं ॥६४॥
अंतकाळीं जे मती । तेचि प्राणियांसी जाण गती ।
यालागीं श्रीकृष्ण चित्तीं । अहोरातीं स्मरावा ॥६५॥
परी मृगदेहीं जाण । भरतासी श्रीकृष्णस्मरण ।
पूर्वीं केलें जें अनुष्ठान । तें अंतर जाण कदा नेदी ॥६६॥
मागुता तिसरे जन्में पाहें । तो ’जडभरत’ नाम लाहे ।
तेथें तो निर्ममत्वें राहे । तेणें होय नित्यमुक्त ॥६७॥
बहुतां जन्मींची उणीवी । येणें जन्में काढिली बरवी ।
निजात्मा आकळोनि जीवीं । परब्रह्मपदवी पावला ॥६८॥
ऋषभपुत्रउत्पत्ती । शतबंधु जाण निश्चितीं ।
त्यांत हे ज्येष्ठाची स्थिती । उरल्यांची गती ते ऐका ॥६९॥;