श्लोक ३७ वा
मयोपबृंहितं भूम्रा ब्रह्मणानन्तशक्तिना ।
भूतेषु घोषरूपेण बिसेषूर्णेव लक्ष्यते ॥३७॥
जो मी अंतर्यामी आपण । `भूमा' म्हणिजे अपरिच्छित्र ।
सबाह्य व्यापकत्वें संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण जो कां मी ॥३९०॥
तेणें म्यां वेद अधिष्टित । या नांव बोलिजे `उपबृंहित' ।
अधिष्ठाता विकारी होत । जेवीं अभ्रांत चंद्रमा ॥९१॥
कां अग्नि काष्ठीं अधिष्ठितां । त्यासी तत्काळ ये साकारता ।
मग प्रबळ आणि शांतता । या विकारावस्था अग्नीसी ॥९२॥
यापरी विकारी नव्हे जाण । मी अंतर्यामी नारायण ।
ब्रह्मस्वरूपें परिपूर्ण । विकारनिर्दळण स्वयें कर्ता ॥९३॥
मीचि विकारांचा कर्या । करूनि मीचि अकर्ता ।
त्या मज न ये विकारता । ब्रह्मस्वरूपतास्वभावें ॥९४॥
ब्रह्म केवळ निर्धर्म । तें केवीं विकारी कर्म ।
ऐसा कांहीं कल्पिसी भ्रम । तेंही सुगम सांगेन ॥९५॥
माझी योगमाया अनंतशक्ती । जे शंभुस्वयंभूंसी न ये व्यक्ती ।
तिचेनि योगें मी चिन्मूर्ती । उत्पत्तिस्थितिसंहर्ता ॥९६॥
एवं योगमाया स्वभावतां । मी सकळ करूनि अकर्ता ।
त्या मज देशतां काळतां । विकारिता स्पर्शेना ॥९७॥
जरी सत्य असती भेदता । तरी मज येती विकारिता ।
माझे निजस्वरूपीं पाहतां । भेदाची वार्ता असेना ॥९८॥
जेवीं भ्रमें सर्पत्व दोरावरी । परी दोर सर्पत्व कदा न धरी ।
तेवीं मी परमात्मा श्रीहरी । करूनि अविकारी निजरूपें ॥९९॥
घोषरूपें अतिसूक्ष्म नादु । तो मी प्रणवरूपें निजवेदु ।
प्राणिमात्रीं असें स्वतःसिद्धु । परी नेणती बोधु सकामत्वें ॥४००॥
जेवीं कां विष्ठा भक्षी सूकर । उपेक्षी कस्तुरी कापुर ।
तेवीं सूक्ष्मवेदाचें निजसार । सकाम नर उपेक्षिती ॥१॥
मी निजानंद हृदयाआंत । त्या मज उपेक्षूनि भ्रांत ।
कामासक्तीं लोलंगत । द्वारें वोळंगत नीचांचीं ॥२॥
त्या हृदयस्थ देवाचें ध्यान । नित्य योग्यासी निदिध्यासन ।
सम करोनि प्राणापान । सदा अनुसंधान नादाचें ॥३॥
माझें वेदतत्त्व जें कां गुप्त । प्रणवरूपें हृदयाआंत ।
योगीसदा अनुभवित । त्यांचे स्वरूप निश्चित अवधारीं ॥४॥
जैसा कमळमृणाळबिसतंत । तैसा लूक्ष्म नाद अत्यंत ।
नाभीपासोनि ब्रह्मरंध्रांत । ओंकार स्वरांत लक्षिती ॥५॥
ऐसा ओंकाराच्या स्वराआंत । नाभीपासोनि ब्रह्मरंध्रांत ।
सूक्ष्म नादाचा निजतंत । योगधारणा राखत महायोगी ॥६॥
हाचि नाद पैं प्रस्तुत । लौकिकीं असे भासत ।
दोंही कर्णीं देतां हात । तोचि घुमघुमित निजनादु ॥७॥
योगी म्हणती `अनाहत शब्द' । वेदांती म्हणती `सूक्ष्म नाद' ।
आम्ही म्हणों हा `शुद्धवेद' । असो अनुवाद हा नांवांचा ॥८॥
ऐशिया स्वतःसिद्ध वेदापाशीं । श्रद्धा नुपजेचि प्राणियांसी ।
यालागीं सूक्ष्म वेद स्थूलतेसी । म्यां जनहितासी आणिला ॥९॥
तोचि स्थूलत्वें झाला प्रकट । ते प्रकट होती वेदवाट ।
दृष्टांतेंकरूनि स्पष्ट । तुज मी चोखट सांगेन ॥४१०॥
ऐसें बोलिला श्रीनिवास । तेणें उल्हासला हृदयहंस ।
म्हणे मजकारणें हृषीकेश । अत्यंत सौरस निरूपणीं ॥११॥
मजवरी बहुत स्न्नेहाळ । मज उद्धारावया गोपाळ ।
निरूपणीं सुकाळ । अतिसरळ अमृतरसु ॥१२॥
ऐसें उद्धवाचें बोलणें ऐकोनी । काय बोलिला सारंगपाणी ।
म्हणे मी तोचि निरूपणीं । सांगेन तुजलागोनी उद्धवा ॥१३॥