श्लोक ४ था
स इदानीं सुमहता कालेनामित्रकर्शन ।
न प्रायो भविता मर्त्यलोके प्रागनुशासितः ॥४॥
काम क्रोध लोभ अभिमान । हे भक्तांचे वैरी सहाजण ।
त्यांचें तूं करिशी निर्दळण । अरिमर्दन या हेतू ॥३१॥
भक्तांचें अरिनिर्दळण । तुजवांचोनि कर्ता आन ।
तिहीं लोकीं नाहीं जाण । अनन्यशरण यालागीं ॥३२॥
तुवां कल्पाचिये आदीसी । उपदेशिलें सनकादिकांसी ।
बहुकाळ जाहले त्या बोलासी । ते धर्म कोणापाशीं प्रायशां नाहीं ॥३३॥
प्रायशां ये कालीं नर । नाहीं स्वधर्मी तत्पर ।
शिश्नोदरीं अत्यादर । स्वधर्मविचार विसरोनी ॥३४॥
याथातथ्यें धर्मप्रतिष्ठा । करी ऐसा नाहीं उपदेष्टा ।
यालागीं जी वैकुंठा । स्वधर्मनिजनिष्ठा मज सांग ॥३५॥