श्लोक ३४ वा
त्यक्त्वा सुदुस्त्यजसुरेप्सितराज्यलक्ष्मीं, धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यम् ।
मायामृगं दयितयेप्सितमन्वधावद्वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥३४॥
जे राज्यश्रियेकारणें । अमर लोलंगत मनें ।
तें राज्य श्रीरामें त्यागणें । वचनाकारणें पित्याच्या ॥८३॥
श्रीराम धर्मिष्ठ चोख । पितृवचनप्रतिपाळक ।
उद्भट राज्य सांडोनि देख । निघे एकाएक वनवासा ॥८४॥
वनवासा चरणीं जातां । सवें घेतली प्रिया सीता ।
येणें बोलें स्त्रीकामता । श्रोतीं सर्वथा न मानावी ॥८५॥
तरी केवळ स्त्री नव्हे सीता । ते निजभक्त जाण तत्त्वतां ।
सांडूनि राजभोगा समस्तां । सेवेच्या निजस्वार्था वना आली ॥८६॥
राज्यीं असतां रघुवीरें । दास्य दासां वांटलें अधिकारें ।
ते मी एकली एकसरें । सेवा वनांतरीं अवघीचि करीन ॥८७॥
ते सेवा यावया हाता । सकळ सेवेच्या निजस्वार्था ।
चरणचालीं चालोनि सीता । आली तत्त्वतां वनवासासी ॥८८॥
कैसें श्रीरामसेवेचें सुख । चरणीं चालतां नाठवे दुःख ।
विसरली मायामाहेरपक्ष । अत्यंत हरिख सेवेचा ॥८९॥
ऐशिया मनोगत-सद्भावा । वना आली करावया सेवा ।
श्रीराम जाणे भक्तभावा । येरां देवां दानवां कळेना ॥३९०॥
निजभक्तांचें मनोगत । जाणता एक रघुनाथ ।
कां श्रीरामसेवेचा स्वार्थ । जाणती निजभक्त भजनानंदें ॥९१॥
भगवद्भजनाचें सुख । भक्त जाणती भाविक ।
भावेंवीण भजनसुख । अनोळख अभाविकां ॥९२॥
पूर्ण भाविक भक्त सीता । हें कळलेंसे रघुनाथा ।
यालागीं तिचिया वचनार्था । होय धांवता मृगामागें ॥९३॥
मायिक मृगाचें सुवर्णभान । जरी जाणे रघुनंदन ।
तरी भक्तलळे पाळण । करी धावन मृगामागें ॥९४॥
बाळकाचेनि छंदें जाण । जेवीं माउली नाचे आपण ।
तेवीं मायामृगापाठीं धावन । करी रघुनंदन निजभक्तवाक्यें ॥९५॥
जो राम वानरांच्या गोष्टी । ऐकतां विकल्प न धरीं पोटीं ।
तो सीतेच्या वचनासाठीं । धांवे मृगापाठीं नवल कायी ॥९६॥
भलतैसें भक्तवचन । मिथ्या न म्हणे रघुनंदन ।
यालागीं निजचरणीं धावन । करी आपण मृगामागें ॥९७॥
एवं भक्तवाक्यें उठाउठी । जो पायीं धांवे मृगापाठीं ।
ज्याचे चरणरेणु अणुकुटी । वंदिती मुकुटीं शिवादि सर्व ॥९८॥
तो मृगामागें धांवतां जाण । पावन केले पाषाण ।
त्याच्या चरणां अनन्य शरण । अभिवंदन सद्भावें ॥९९॥
एवं महापुरुषाचे चरण । अभिवंदनें करिती स्तवन ।
कलियुगीं कीर्तनें जन । परम पावन नित्ययुक्त ॥४००॥