श्लोक १६ वा
विसृज्य स्मयमानान् स्वान्, दृशं व्रीडां च दैहिकीम् ।
प्रणमेद्दण्डवद्भूमावाश्वचाण्डालगोखरम् ॥१६॥
सुहृदां देखतां लोटांगण । घालतां हांसतील संपूर्ण ।
यालागीं विदेशीं आपण । घालावें लोटांगण गो-खर-श्वानां ॥३३॥
ऐशी लौकिकाची लाज । धरितां सिद्धी न पवे काज ।
लोटांगणाचें निजभोज । नाचावें निर्लज्ज सुहृदांपाशीं ॥३४॥
सासु सासरा जांवयी । इष्ट मित्र व्याही भाई ।
ज्यांसी देखतांचि पाहीं । विरजे देहीं लाजोनी ॥३५॥
त्यांसि देखतां आपण । लाज सांडोनियां जाण ।
चांडाळादि हीन जन । गो खर श्वान वंदावीं ॥३६॥
तेंहीं ऐसें गा वंदन । दंडाचे परी आपण ।
सर्व भूतां लोटांगण । भगवद्भावें जाण घालावें ॥३७॥
तेथ ब्रह्मवेत्ते ब्राह्मण । कां अत्यंजादि हीन जन ।
यांच्या ठायीं लोटांगण। सारिखें जाण सद्भावें ॥३८॥
गाय गाढव सूकर श्वान । यांच्याही ठायीं आपण ।
दंडवत लोटांगण । सद्भावें संपूर्ण घालावें ॥३९॥
साधावया निजकार्य पूर्ण । लोकलाज सांडावी खणोन ।
माशी मुंगी मुरकूट जाण । त्यांसीही लोटांगण दंडप्राय ॥३४०॥
भावें वंदितां गो-खर-रज । प्रकटे भगवद्भजनतेज ।
त्यजूनि स्वजनांची लाज । वंदीं निजभोज लोटांगणेंसीं ॥४१॥
त्यजूनि संदेहविषमता । लोकलज्जे हाणोनि लाता ।
भगवद्बुद्धीं सर्वभूतां । घालावें तत्त्वतां लोटांगण ॥४२॥
म्हणसी ऐसें हें साधन । कोठवरी करावें आपण ।
तेंचि मर्यादानिरुपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४३॥