श्लोक ३६ वा
श्रीभगवानुवाच-मनः कर्ममयं नृणामिन्द्रियैः पंचभिर्युतम् ।
लोकाल्लोकं प्रयात्यन्य आत्मा तदनुवर्तते ॥३६॥
अकरा इंद्रियें पंच महाभूतें । हें सोळा कळांचें लिंगदेह येथें ।
मुख्यत्वें प्राधान्य मनाचें तेथें । नाना विषयांतें कल्पक ॥४२०॥
येथ लिंगदेह तेंचि मन । मनाआधीन इंद्रियें जाण ।
मनाचेनि देहासी गमन । तेथ देहाभिमान मनासवें ॥२१॥
मन ज्यातें सोडूनि जाये । तेथ अभिमान उभा न राहे ।
मनायोगें अभिमान पाहें । देहाचा वाहे खटाटोप ॥२२॥
जेथ विषयासक्त मन । करी शुभाशुभ कर्माचरण ।
तेव्हां होऊनि कर्माधीन । देही करी गमन देहांतरा ॥२३॥
आत्मा यासी अलिप्त भिन्न । परी देहासवें दावी गमन ।
हें अतिअतर्क्य विंदान । ऐक लक्षण तयाचें ॥२४॥
घट जेथ जेथ हिंडों वैसे । आकाश त्यासवें जात दिसे ।
परी ढळणें नाहीं आकाशें । आत्म्याचें तैसें गमन येथें ॥२५॥
घटामाजीं भरिजे अमृत । अथवा घालिजे खातमूत ।
आकाश दोहींसीं अलिप्त । तेवीं सुखदुःखातीत देहस्थ आत्मा ॥२६॥
घट घायें कीजे शतचूर । परी आकाशीं न निघे चीर ।
तेवीं नश्वरीं अनश्वर । जाण साचार निजात्मा ॥२७॥
घट फुटोनि जेथ नाशे । तेथ आकाश आकाशीं सहज असे ।
नवा घट जेथ उपजों बैसे । तों तेथ आकाशें व्यापिजे ॥२८॥
तेवीं देहाचें नश्वरपण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण ।
आत्म्यासी देहांतरगमन । जन्ममरण असेना ॥२९॥
देहीचें देहांतरगमन । वासनायोगें करी मन ।
तें मनोगमनाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥४३०॥