श्लोक ३५ वा
वैतसेनस्ततोऽप्येवमुर्वश्या लोकनिस्पृहः ।
मुक्तसङगो महीमेतामात्मारामश्चचार ह ॥३५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे ऐलगीतं नाम षड्विंशोऽध्यायः ॥२६॥
पूर्वीं सूर्यवंश प्रसिद्ध । तेथ सोमवंशाचा संबंध ।
’वैतसेन’ श्लोकींचें पद । लावूनि गोविंद बोलिला ॥६२॥
उमावनीं अतिएकांत । तेथ उमा आणि उमाकांत ।
विगतवासेंसीं क्रीडत । स्वानंदयुक्त स्वलीला ॥६३॥
तेथ शिवाचे दर्शनासी । अवचटें आले सप्तऋषी ।
लज्जा उपजली पार्वतीसी । तिणें त्या वनासि शापिलें ॥६४॥
’जो पुरुष या वनाआंत । येईल तो हो स्त्रीरुप एथ’ ।
ऐसा शाप क्रोधयुक्त । वदली निश्चित जगदंबा ॥६५॥
तेथ राजा ’सुद्युम्न’ सूर्यवंशी । नेणोनियां शाप प्रभावासी ।
पारधी आला त्या वनासी । सकळ सेनेसीं सन्नद्ध ॥६६॥
रिघतांचि त्या वनाआंत । पुरुषत्व पालटलें तेथ ।
बाप शापाचें सामर्थ्य । झाले समस्त स्त्रीरुप ॥६७॥
तेथ पुरुषत्वाची आठवण । निःशेष विसरलें मन ।
आपण पूर्वी होतों कोण । हेंही संपूर्ण विसरले ॥६८॥
अश्व झाले अश्विनी । हस्ती झाले हस्तिणी ।
पुरुष झाले कामिनी । तत्क्षणीं त्या वनांत ॥६९॥
तेथ पुरुषकामें कामासक्ती । अनुकूल पुरुषांप्रती ।
स्त्रिया गेलिया त्या समस्ती । अतिकामरतीं संभोगा ॥४७०॥
राजा सुद्युम्न झाला नारी । अतिसुकुमार सुंदरी ।
तो सोमपुत्र बुधातें वरी । अतिप्रीतीकरीं भाळोनि ॥७१॥
बुधें सुद्युम्न देखोनि नारी । तो भुलला स्त्रीकामेकरीं ।
एवं अतिप्रीतीं परस्परीं । येरयेरावरी भाळलीं ॥७२॥
बुध महाराज चूडामणी । तो सुद्युम्नातें स्त्रीत्वें पर्णी ।
केली पटाची निजराणी । बाप करणी कर्माची ॥७३॥
सुद्युम्न बुधवीर्येंकरीं । पुरुरवा जन्मे त्यांचे उदरीं ।
एवं सूर्यवंशामाझारीं । सोमवंश यापरी संचरला ॥७४॥
हे सोमवंशींची आद्यकथा । एथूनि सोमवंश वाढता ।
श्रीकृष्ण बोलिला ध्वनितार्था । तेचि म्यां कथा उपलविली ॥७५॥
सुद्युम्न झाला बुधाची नारी । मागें सूर्यवंशा माझारीं ।
नाहीं राज्यासी अधिकारी । संकट भारी वोढवलें ॥७६॥
ते सूर्यवंशींचा कुळगुरु । वसिष्ठ महायोगीश्वरु ।
तेणें करुनि अत्यादरु । गौरी-हरु प्रार्थिलीं ॥७७॥
प्रसन्न करुनि पार्वतीसी । मागे सुद्युम्नाच्या उच्छापासी ।
येरी सांगे महादेवासी । तुम्हीं वसिष्ठासीं बुझवावें ॥७८॥
जें भवानीचें शापवचन । कदा अन्यथा नव्हे जाण ।
धरावया वसिष्ठाचें मन । नवलविंदान शिवें केलें ॥७९॥
शुक्ल पक्षीं सुद्युम्नासी । पुरुषत्व प्राप्त होईल त्यासी ।
कृष्णपक्षीं बुधापाशीं । स्त्रीभावेंसीं वर्तेल ॥४८०॥
पक्षें पुरुष पक्षें नारी । ऐशिया उच्छापाची परी ।
शिवें करुनि कृपेकरीं । केला अधिकारी निजराज्या ॥८१॥
पुरुषत्व पावल्या सुद्युम्नासी । तें पुरुषत्व नावडे त्यासी ।
स्त्रीसंभोगें बुधापाशीं । अतिप्रीतीसीं लोधला ॥८२॥
स्वर्ग अप्सरा आलिया पाशीं । त्याही नावडती सुद्युम्नासी ।
त्याहूनि प्रीति बुधापाशीं । स्त्रीभावेंसीं अनिवार ॥८३॥
बुधासीही स्वर्गांगना । संभोगीं न येती मना ।
ऐसी अतिप्रीति सुद्युम्ना । स्त्रीभोगें जाणा विगुंतली ॥८४॥
पुरुषीं पुरुषत्वाची रती । भोगुं जाणें मी श्रीपती ।
इतर बापुडीं तीं किती । स्त्रीदेहासक्तीं भुललीं ॥८५॥
स्त्रीदेहीं जो आत्मा असे । तो भोगिजे म्यां हृषीकेशें ।
इतरांसी स्त्रीदेहींचें पिसें । विषयावेशें भुलोनी ॥८६॥
असो हें सांगावें किती । कामीं निष्कामतेची रती ।
ते मी जाणें रमापती । कां जाणती निजानुभवी ॥८७॥
पुरुत्वापरीस कामरती । स्त्रीदेहीं अतिआसक्ती ।
त्या स्त्रीकामाची निवृत्ती । जाण निश्चितीं सत्संगें ॥८८॥
वसिष्ठाचिये सत्संगतीं । झाली स्त्रीभावाचि निवृत्ती ।
सुद्युम्न पावला पुरुषत्वप्राप्ती । धन्य त्रिजगतीं सत्संग ॥८९॥
पुरुषत्व पावोनि सुद्युम्न । निजनगरा येतां जाण ।
स्त्रीभावें नष्टलें सैन्य । एकला आपण स्वयें आला ॥४९०॥
एवं निःशेष विगत सैन्य । यालागीं नांवें ’वीतसेन’।
त्या वीतसेनाचा पुत्र जाण । ’वैतसेन’ पुरुरवा ॥९१॥
तेणें निजात्मता अतिविरक्ती । सांडूनि स्वर्गभोगसंपत्ती ।
त्यजूनि उर्वशीकामासक्ती । आत्मारामस्थिती पावला ॥९२॥
आत्माराम निजस्थिती । मिथ्या देहसंग सांगाती ।
निजात्मबोधें त्रिजगतीं । स्वानंदें नृपति विचरत ॥९३॥
जेथें जेथें पाउल उठी । तेथें तेथें होती सुखाच्या कोटी ।
स्वानंदें कोंदली सृष्टी । ब्रह्मदृष्टीं विचरतु ॥९४॥
ब्रह्मीं विचरतां ब्रह्मपणें । ब्रह्मरुप झालें जिणें ।
विसरला जिणेंमरणें । पूर्णीं पूर्णपणें परिपूर्ण ॥९५॥
हें उर्वशी-पुरुखोपाख्यान । जो स्वयें ऐके सावधान ।
तैं दोष जाती अगम्यागमन । विरक्ति संपूर्ण साधकां ॥९६॥
यापरी वैराग्ययुक्तीं । राजा पावला ब्रह्मप्राप्ती ।
वैराग्य उपजे सत्संगतीं । सत्संगें विरक्ती मद्भजनें ॥९७॥
’सद्भावें करितां माझी भक्ती । साधकां उपजे विरक्ती’ ।
ऐसें बोलिला श्रीपती । तें उद्धवें चित्तीं दृढ धरिलें ॥९८॥
ते भजनक्रियेचा प्रश्न । पुढिले अध्यायीं जाण ।
उद्धव पुसेल आपण । जेणें श्रीकृष्ण संतोषे ॥९९॥
उद्धव पुसेल गोड गोठी । जेणें श्रीकृष्ण सुखावे पोटीं ।
तेणें स्वानंदें निजपुष्टी । भजनहातवटी सांगेल ॥५००॥
उपासनाकांडरहस्य पूर्ण । मुख्य क्रियायोगनिरुपण ।
समूळ आगमलक्षण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥१॥
ते कथेसी अवधान । श्रोतां द्यावें सावधान ।
एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन निजबोधें ॥५०२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
एकाकारटीकायां ऐलगीतोपाख्यानं नाम षडविंशोऽध्यायः ॥२६॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥श्लो.३५॥ओ.५०२॥