श्लोक २९ वा
एवं कृष्णात्मनाथेषु मनुष्येषु च सौहृदम् ।
परिचर्यां चोभयत्र महत्सु नृषु साधुषु ॥२९॥
एवं दारा गेह देह संपदा । आत्मार्पणें शुद्ध श्रद्धा ।
भजले सर्वकाळीं सर्वदा । ते भक्त गोविंदा पढियंते ॥५६७॥
जो सर्व भूतीं हृदयस्थु । परमात्मा श्रीकृष्णनाथु ।
त्याचे ठायीं जो भक्तु । साधावया निजस्वार्थु सर्वस्वें भजे ॥५६८॥
त्या हृदयस्थाचे ठायीं । दृढ दृष्टी जंव बसली नाहीं ।
तंव सगुणमूर्ती हृदयीं । भजावी पाहीं सर्वात्मभावें ॥५६९॥
सगुणमूर्ती नातुडे ध्यानीं । तरी भजावें प्रतिमेच्या स्थानीं ।
तेथेंही चलाचल दोनी । भजाव्या गुरुवचनीं समसाम्यभावें ॥५७०॥
ज्या उपासक पूजिती । त्या जाणाव्या 'चला' मूर्ति ।
ज्या पांडुरंगादि द्वारावती । त्या ’स्थावरा’ मूर्ति पुराणोक्त ॥५७१॥
त्या मूर्तीहूनि श्रेष्ठ स्थान । पूर्ण पूज्यत्वें ब्राह्मण ।
तेथें करावें गा भजन । सर्वस्वें जाण सर्वदा ॥५७२॥
त्या ब्राह्मणामाजीं अतिश्रेष्ठ । श्रोत्रिय सदाचारनिष्ठ ।
त्यांतही वेदशास्त्रार्थीं प्रविष्ट । ते अतिवरिष्ठ पूज्यत्वें ॥५७३॥
त्यांहीमाजीं जे भागवत । भागवतधर्मीं नित्य निरत ।
जे निष्कर्मेंसीं भगवद्भक्त । ज्यांचा भावार्थ श्रीकृष्णीं ॥५७४॥
ज्यांसी आत्मा श्रीकृष्ण हृदयस्थ । ज्यांचा अनन्य स्वामी श्रीकृष्णनाथ ।
ऐसे जे भगवद्भक्त । ते पूज्य निश्चित निजभक्तां ॥५७५॥
अतिमहत्त्वें पूज्य गहन । ज्याचे सुर नर वेद बंदीजन ।
तो सद्गुरु श्रेष्ठ पूज्य स्थान । शिष्यासी जाण सर्वस्वें ॥५७६॥
गुरु ब्रह्म दोनी समान । हेंही वचन दिसे गौण ।
गुरुवाक्यें ब्रह्मा ब्रह्मपण । तेथें व्हावया समान भिन्नत्व नुरे ॥५७७॥
जैसा देवाचे ठायीं भावो । तैसाचि गुरुचरणीं सद्भावो ।
गुरुदेवांमाजीं पहा हो । भिन्नत्वभावो असेना ॥५७८॥
देवो पूजिल्या गुरु तोषे । गुरु पूजिल्या देवो संतोषे ।
दों नांवांचेनि हरुषें । स्वरूपें एकें वर्तती ॥५७९॥
सुवर्ण आणि कांकण । दों नांवीं एक सुवर्ण ।
तेवीं गुरु-ब्रह्मांमाजीं जाण । भिन्नपण असेना ॥५८०॥
त्या सद्गुरुचें निजभजन । चित्तवित्तें अवंचन ।
गुरुचरणीं आत्मार्पण । करावें आपण सर्वस्वेंसीं ॥५८१॥
तैसेचि साधु श्रोते सज्ञान । तेही मानावे सद्गुरुसमान ।
त्यांचेनि संवादें आपण । श्रवण कथन करावें ॥५८२॥