श्लोक १५ वा
न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शङ्करः ।
न च सङ्कर्षणो न श्रीर्नैवात्मा च यथा भवान् ॥ १५ ॥
माझ्या भक्तांची मज प्रीती । ते मीचि जाणें श्रीपती ।
ते उपमेलागीं त्रिजगतीं । नाही निश्चिती कांटाळें ॥४१॥
जो अनन्य झाला माझे भक्ती । तेव्हांचि त्याची अविद्यानिवृत्ती ।
ऐशिया भक्तांची जे मज प्रीती । ते सांगूं मी किती उद्धवा ॥४२॥
ब्रह्मा माझे पोटींचें बाळ । त्याचे लळे मी पुरवीं सकळ ।
परी भक्तांच्या ऐसा प्रबळ । प्रीतिकल्लोळ तेथ नाहीं ॥४३॥
म्यां ब्रह्मा लाविला कर्मपंथा । भक्तांसी दिधली निष्कर्मता ।
यालागीं न वचें मी ब्रह्मा प्रार्थितां । होय भात खाता गोवळ्यांचा ॥४४॥
उणें आणूनि ब्रह्मयासी । मी तों झालों वत्सें वत्सपांसी ।
एवं निजभक्तांच्या ऐसी । प्रीती ब्रह्मयासी मज नाहीं ॥४५॥
असो ब्रह्मयाची ऐशी कथा । संकर्षण माझा ज्येष्ठ भ्राता ।
परी भक्तांच्या ऐशी सर्वथा । नसे प्रीती तत्त्वतां तयासी ॥४६॥
कौरवांच्या पक्षपातासी । उणें आणोनि बळिभद्रासी ।
म्यां वांचविलें निजभक्तांसीं । पांडवांसी निजांगें ॥४७॥
तुजदेखतां भीष्माच्या पणीं । म्यां हारी घेऊनि रणांगणीं ।
वांचविला कोदंडपाणी । भक्तचूडामणी अर्जुन ॥४८॥
रमा माझ्या पट्टाची राणी । ते म्यां सेवेसी लाविली चरणीं ।
खांदीं वाहिल्या गौळणी । भक्तशिरोमणी गोपिका ॥४९॥
जे लक्ष्मी निःशेष उपेक्षिती । ते मज पूज्य परम प्रीतीं ।
जे मज लक्ष्मी मागती । त्यांसी श्री ना श्रीपती ऐसें होय ॥१५०॥
लक्ष्मी उपेक्षूनि निश्चितीं । मज निजभक्त आवडती ।
मज पढियंता उमापती । त्याहून अतिप्रीती भक्तांची ॥५१॥
ज्या महादेवाचेनि गुणें । म्यांही श्यामवर्ण धरणें ।
ज्या महादेवाचेनि वचनें । म्यां मोहिनी होणें दुसरेनी ॥५२॥
ते मोहिनीच्या दर्शनीं । म्यां शिव भुलविला तत्क्षणीं ।
रुक्मांगद मोहिनीपासूनी । अर्धक्षणीं तारिला ॥५३॥
यापरी माझ्या भक्तांहुनी । मज प्रिय नव्हे शूलपाणी ।
मज पढियंता त्रिभुवनीं । भक्तावांचुनी आन नाहीं ॥५४॥
आगमनिगमीं प्रतिपाद्य । माझी चतुर्भुजमूर्ति शुद्ध ।
ते निजहृदयीं मी परमानंद । भक्तनिजपद वाहतसें ॥५५॥
मज निजदेहाची नाहीं गोडी । गोवळ झालों अतिआवडीं ।
गायी राखें अरडीदरडी । कीं थापटीं घोडीं भक्तांचीं ॥५६॥
मी अवाप्तसकळकाम । परी प्रेमळांलागीं सदा सकाम ।
देखतां प्रेमळांचा भाव परम । मी आत्माराम उडी घालीं ॥५७॥
प्रेमळ देखतांचि दिठीं । मी घे आपुलिये संवसाटीं ।
नव्हतां वरीव दें सुखकोटी । न ये तरी उठाउठी सेवक होय ॥५८॥
सांडूनि महत्त्वपरवडी । मी निजभक्तांचीं उच्छिष्टें काढीं ।
भक्तकाजाचे सांकडीं । करीं कुरंवडी देहाची ॥५९॥
उपेक्षूनि निजदेहासी । उद्धवा तुजसारिखिया भक्तांसी ।
मज आवडती ते अहर्निशीं । जीवें सर्वस्वेंसी पढियंते ॥१६०॥
आवडी करितां माझें भजन । मज पूज्य झाले भक्तजन ।
त्या भक्तांचें निजलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६१॥