श्लोक १ ला
श्रीभगवानुवाच-
यो विद्याश्रुतसंपन्न आत्मवात्रानुमानिकः ।
मायामात्रमिदं ज्ञात्वा ज्ञानं च मयि संन्यसेत् ॥१॥
वेदशास्त्रार्थीं परिनिष्ठित । श्रवणमननाभ्यासयुक्त ।
ज्यासी ब्रह्मविद्या प्राप्तः । सुनिश्चित स्वानुभवें ॥२५॥
तोचि अनुभव ऐसा । दोराअंगी सर्पु जैसा ।
न मारितां नाशे आपैसा । भवभ्रम तैसा त्या नाहीं ॥२६॥
जेवीं कां नटाची रावो राणी । दोघें खेळती लटिकेपणीं ।
तेवीं प्रकृतिपुरुषउभवणी । मिथ्यापणीं जो जाणे ॥२७॥
जैशीं भिंतीमाजीं नानाकार । चित्रें लिहिलीं विचित्र ।
ते भिंतीचि एक साचार । तेंवी ऐक्यें चराचर जो देखे ॥२८॥
स्वप्नींचीं नाना कर्में जाण । त्याचें जागृतीं नव्हे बंधन ।
तेवीं मिथ्या निजकर्माचरण । जीवीत्वेंसीं प्राण जो देखे ॥२९॥
ऐशी साचार ज्याची स्थिती । त्या नांव शुद्ध `आत्मप्राप्ती' ।
`निजानुभव' त्यातें म्हणती । हें जाण निश्चितीं उद्धवा ॥३०॥
आणिक एक तेथींची खूण । `विषयावीण स्वानंद पूर्ण' ।
हें अनुभवाचें मुख्य लक्षण । सत्य जाण सात्वता ॥३१॥
ऐसा अनुभव नसतां देख । केवळ ज्ञान जें शाब्दिक ।
त्यातें म्हणिजे `आनुमानिक' । जाण निष्टंक निजभक्ता ॥३२॥
ज्याच्या अनुभवाभीतरीं । नाहीं अनुमानासी उरी ।
जो अपरोक्षसाक्षात्कारीं । निरंतरी नांदत ॥३३॥
ऐसा जो पुरुष जाण । तेणें ज्ञानाचें साधन ।
आणि वृत्तिरूप जें ज्ञान । तेंही आपण त्यागावें ॥३४॥
तें न त्यागितां लवलाहें । सहजचि त्याचा त्याग होये ।
जेवीं सूर्योदयीं पाहें । सचंद्र तेज जाये तारागणाचें ॥३५॥
जेवीं हनुमंत देखोनि येतां । नवचंडी पळे तत्त्वतां ।
मा राहावया येरां भूतां । उरी सर्वथा उरेना ॥३६॥
तेवीं माझे साक्षात्कारीं । त्यासी बद्धता नाहीं खरी ।
मा ज्ञान तियेचे निवृत्तीवरी । कैशापरी राहेल ॥३७॥
माझिया अनुभवाच्या ठायीं । बंधमोक्ष मिथ्या पाहीं ।
तेथ साधनज्ञानाचा कांहीं । उपेगु नाहीं उद्धवा ॥३८॥
परमात्मस्वरूपाच्या ठायीं । बंधमोक्ष मायिक पाहीं ।
तेथें ज्ञानध्यान जें कांहीं । न त्यागितां पाहीं त्यागिलें ॥३९॥
त्यागोनियां ज्ञानध्यान । ज्ञानियांसी माझी प्रीति गहन ।
तेंचि प्रीतीचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४०॥