श्लोक ४ था
वसुदेव उवाच-भगवन्भवतो यात्रा स्वस्तये सवदहिनाम् ।
कृपणानां यथा पित्रोरुत्तमश्लोकवर्त्मनाम् ॥४॥
स्वलीला कृपा केली तुम्हीं । तेणें परम सभाग्य जाहलों जी मी ।
तुमचेनि आगमनें आम्ही । कृतकृत्य स्वामी सन्निधिमात्रें ॥४३॥
चुकलिया निजजननी । बाळक दीन दिसे जनीं ।
त्यासी मातेच्या आगमनीं । संतोष मनीं निर्भर ॥४४॥
त्याहूनि श्रेष्ठ तुमची यात्रा । नित्य सुखदाती भूतमात्रां ।
स्वलीला तुम्ही मही विचरां । दीनोद्धारालागुनी ॥४५॥
मातेच्या आगमनीं निजबाळा । दृष्टिउत्संगीं नित्य नवा सोहळा ।
तुमची यात्रा दीनां सकळां । भोगवी स्वलीळा निजात्मसुख ॥४६॥
माता सुख दे तें नश्वर । तुमच्या आगमनीं अनश्वर ।
नित्य चित्सुख चिन्मात्र । परात्पर भोगावया ॥४७॥
तुम्ही भागवतधर्ममार्गगामी । तैंचि तुमची भेटी लाहों आम्ही ।
जैं पुण्यकोटी निष्कामीं । प्रयागसंगमीं केलिया ॥४८॥
नारदा तूं भगवद्रूप । तुझी भेटी करी निष्पाप ।
तुवां कृपा केलिया अल्प । स्वयें चित्स्वरुप ठसावे ॥४९॥;
तुझेनि भक्तीसी महिमा अमूप । तुझेनि वाढला भक्तिप्रताप ।
तुझेनि भक्ति भगवद्रूप । तूं चित्स्वरुप निजनिष्ठा ॥५०॥
तूं भक्तिप्रकाशकु दिवटा । कीं भक्तिमार्गींचा मार्गद्रष्टा ।
नारदा तुझा उपकार मोठा । भक्तीच्या पेठा वसविल्या तुवां ॥५१॥
मुख्य भागवतशास्त्र पूर्ण । तुवां व्यासासी उपदेशून ।
प्रगट करविलें दशलक्षण । दीन जन उद्धरावया ॥५२॥
नारदा तूं देवासमान । हेही उपमा दिसे गौण ।
तेचिविषयीं निरुपण । वसुदेव आपण निरुपी ॥५३॥