आरंभ
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो देव सहज निज । तूं विश्वात्मा चतुर्भुज ।
अष्टभुज तूंचि विश्वभुज । गुरुत्वें तुज गौरव ॥१॥
निजशिष्याचिया भावार्था । तूं गुरुनामें अभयदाता ।
अभय देऊनि तत्त्वतां । भवव्यथा निवारिसी ॥२॥
निवारुनि जन्ममरण । आपण्या भेटसी आपण ।
तेव्हां गुरुशिष्यनामीं संपूर्ण । तुझें एकपण आभासे ॥३॥
तें एकपण पाहतां दिठीं । एका जनार्दनीं पडे मिठी ।
गुरुत्वें कोंदे सकळ सृष्टी । स्वानंदपुष्टी जग नांदे ॥४॥
तो स्वानंदैकचिद्धन । जगद्गुरु जनार्दन ।
एका जनार्दना शरन। एकीं एकपण दृढ केलें ॥५॥
दृढ केलें जें एकपण । तेंही सद्गुरु झाला आपण ।
तेथें खुंटलें मीतूंपण । एका जनार्दन एकत्वें ॥६॥
यापरी एकाकी एकला । एका जनार्दनें कवयिता केला ।
तो एकादशाचा पावला । अतिसखोला एकत्वबोध ॥७॥
त्या एकत्वाची निजस्थिती । पावला पुरुरवाभूपती ।
दृढ अनुताप विरक्ती । भगवद्भक्ती सत्संगें ॥८॥
हें सव्विसावे अध्यायीं जाण । स्वमुखें बोलिला श्रीकृष्ण ।
सत्संगें भगवद्भजन । तेणें वैराग्य पुर्ण साधकां ॥९॥
न करितां भगवद्भक्ती । कदा नुपजे विरक्ती ।
विरक्तीवीण भगवत्प्राप्ती । नव्हे कल्पांतीं साधकां ॥१०॥
ऐसें बोलिला श्रीकृष्ण । तें उद्धवें जीवीं धरुनि पूर्ण ।
भगवद्भक्ति पूजाविधान । क्रियायोग जाण पुसत ॥११॥