श्लोक १६ वा
नारायणे तुरीयाख्ये भगवच्छब्दशब्दिते ।
मनो मय्यादधद्योगी मद्धर्मा वशितामियात् ॥१६॥
जीव शिव आणि प्रकृती । यांहूनि परती चौथी स्थिती ।
ज्यातें नारायण म्हणती । जाण निश्चितीं सज्ञान ॥९३॥
जागृति स्वप्न सुषुप्ती । यांवेगळी तुरीय स्थिती ।
त्यातें नारायण म्हणती । यथानिगुती सज्ञान ॥९४॥
दृश्य द्रष्टा दर्शन । यांअतीत चौथा जाण ।
त्यातें म्हणती नारायण । ज्ञानविचक्षण निजबोधें ॥९५॥
त्रिपुटीवेगळी जे मातू । असोनियां त्रिपुटी आंतू ।
जो कां त्रिपुटीसी अलिप्तू । तो मी विख्यातू नारायण ॥९६॥
यश श्री वैराग्य ज्ञान । ऐश्वर्य औदार्य हे षड्गुण ।
नित्य वसती परिपूर्ण । तो मी नारायण भगवंत ॥९७॥
त्या मज नारायणातें ध्यातां । माझी वशिता सिद्धी ये हाता ।
सर्व कर्मीं अलिप्तता । भोगून अभोक्ता भोगातें ॥९८॥