श्लोक ७ वा
यदिदं मनसा वाचा चक्षुर्भ्यां श्रवणादिभिः ।
नश्वरं गृह्यमाणं च विद्धि मायामनोमयम् ॥७॥
जें जें दृष्टीं देखिलें । तें तें दृष्यत्वें वाळिलें ।
जें जें श्रवणा गोचर झालें । तेंही वाळिलें शब्दत्वें ॥५०॥
जें जें वाचा वदे । तें तें वाळिजे जल्पवादें ।
वाचिक सांडविलें वेदें । नेति नेति शब्दें लाजिला ॥५१॥
जें जें संकल्पें आकळिलें । तें तें कल्पित पैं झालें ।
जें जें अहंकाराला आलें । तें तें वाळिलें विजातीय ॥५२॥
जें जें इंद्रियें गोचरें । तें तें जाण पां नश्वरें ।
हें नित्यानित्यविचारें । केलें खरें निश्चित ॥५३॥
तोही नित्यानित्यविवेक । जाण पां निश्चित मायिक ।
एवं मायामय हा लोक । करी संकल्पसृष्टीतें ॥५४॥
जेव्हडा देखती संसार । तेव्हडा मायिक व्यवहार ।
हा वोळख तूं साचार । धैर्यनिर्धार धरोनी ॥५५॥
जैशी स्वप्नींची राणीव । केवळ भ्रमचि जाणीव ।
तैसेंचि जाण हें सर्व । भववैभवविलास ॥५६॥