श्लोक ४१ वा
यद्यदिष्टतमं लोके यच्चातिप्रियमात्मनः ।
तत्तन्निवेदयेन्मह्यं तदानन्त्याय कल्पते ॥४१॥
हो कां चंद्रामृत तत्त्वतां । अवचटें आलें भक्ताचे हातां ।
तें अवघेंचि अर्पी भगवंता । देहलोभता न सेवी ॥१३॥
देहासी यावया अमरता । तेणें लोभें सेवावें अमृता ।
अमर अमृतपान करितां । मरती सर्वथा स्वकाळें ॥१४॥
नश्वर देहाचिया ममता । भक्त सेवीना अमृता ।
तेंचि भगवंतासी अर्पितां । अक्षयता अनश्वर ॥१५॥
परिस चिंतामणि न प्रार्थितां । दैवें आलिया भक्ताच्या हातां ।
तो लोभें न ठेवी सर्वथा । अर्पी भगवंता तत्काळ ॥१६॥
लोभें कल्पतरु राखतां । कल्पना वाढे अकल्पिता ।
तोचि भगवंती अर्पितां । निर्विकल्पता स्वयें लाभे ॥१७॥
स्वार्थें चिंतामणि राखितां । अत्यंत हृदयीं वाढती चिंता ।
तोचि भगवंती आर्पितां । निश्चिंतता चित्तासी ॥१८॥
कामधेनु राखतां आपण । अनिवार कामना वाढवी जाण ।
तेचि करितां कृष्णार्पण । निरपेक्षता पूर्ण अंगीं बाणे ॥१९॥
लोभें स्पर्शमणि राखतां । तो वाढवी धनलोभता ।
तोचि भगवंतीं अर्पितां । अर्थस्वार्थतानिर्मुक्त ॥१३२०॥
हो कां देशकाऋतुमेळें । उत्तम पदार्थ अथवा फळें ।
नवधान्यादिकें सकळें । अर्पी भावबळें मजलागीं ॥२१॥
पोटांतूनि आवडता । प्राप्त झालिया पदार्था ।
मजचि अर्पिती सर्वथा । लोलिंगता सांडूनी ॥२२॥
आपुले हृदयींची आवडी । हरिचरणीं लाविली फुडी ।
आतां नाना पदार्थांची जे गोडी । ते मजचि रोकडी अर्पिती ॥२३॥
मज अनंताच्या हातीं । आवडीं अर्पिलें मद्भक्ती ।
त्याचीं फळें सांगतां श्रुती । मुक्या होती सर्वथा ॥२४॥
मी वेदांचा वेदवक्ता । मजही न बोलवे सर्वथा ।
त्याचें फळ तें मीचि आतां । जाण तत्त्वतां उद्धवा ॥२५॥
जीवाहिहोनि वरौती । माझ्या ठायीं अत्यंत प्रीती ।
तिये नांव गा माझी भक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥
तत्काळ मज पाविजे जेणें । ते माझे पूजेचीं स्थाने ।
अतिपवित्रन् जें कल्याणें । तुजकारणें सांगेन ॥२७॥