श्लोक ३० व ३१ वा
चन्दनोशीरकर्पूरकुङ्कुमागरुवासितैः ।
सलिलैः स्नापयेन्मन्त्रौर्नित्यदा विभवे सति ॥३०॥
स्वर्णधर्मानुवाकेन, महापुरुषविद्यया ।
पौरुषेणापि सूक्तेन, सामभीराजनादिभिः ॥३१॥
एक वाळ कर्पूर । चंदन कुंकुम केशर ।
त्यांमाजीं मेळवूनि अगर । धूपिलें नीर स्नपनासी ॥७१॥
सुवासित सपरिकर । गंगाजळ अतिपवित्र ।
शंखमुद्रापुरस्कर । शंखीं तें नीर भरावें ॥७२॥
ऐसें जळ घेऊनि शुद्ध। आपस्तंबशाखेचें प्रसिद्ध ।
’सुवर्णधर्मानुवाक’ पद । तेणें अभिषेक विशद मज करावा ॥७३॥
अथवा केवळ ’पुरुषसूक्त’ । ’रुद्राभिषेक’ विष्णुसूक्त’ ।
इंहीं मंत्रीं मंत्रोक्त । देवासीं यथोक्त स्नान द्यावें ॥७४॥
कां सामवेदींचें गायन । त्यामाजीं सामनीराजन ।
तेणें ही करुनियां जाण । देवासी स्नान करावें ॥७५॥
असल्या वैभवसंपन्न । नित्य द्यावें हें महास्नान ।
नातरी पर्यविशेषें जाण । करावें आपण जयंत्यादिकीं ॥७६॥
आगमोक्त सुलक्षण । ’महापुरुषविद्या’ पूर्ण ।
तेणेंही करुनि आपण । देवासी स्नान करावें ॥७७॥
देवासी पूर्ण झालिया स्नान । करावें मंगळनीरांजन ।
मग वस्त्रें अलंकार भूषण । देवासी आपण अर्पावीं ॥७८॥