श्लोक २४ वा
देवर्षिपितृभूतानि ज्ञातीन्बन्धूंश्च भागिनः ।
असंविभज्य चात्मानं यक्षवित्तः पतत्यधः ॥२४॥
दैवें जोडिलिया धन । आचरावे पंचमहायज्ञ ।
करावें भगवत्पूजन । उल्हासें जाण महोत्साहें ॥७७॥
स्वयें करावें पितृतर्पण । षण्णवति श्राद्धें जाण ।
पितर उद्धरावे आपण । गयावर्जन करोनियां ॥७८॥
जित्यां पितरां त्रिकाळीं नमन । कदा न करावें हेळण ।
त्यांची अवज्ञा आपण । प्राणांतीं जाण न करावी ॥७९॥
त्यांसी गौरवूनि आपण । यथारुचि द्यावें अन्न ।
यथाशक्ति द्यावें धन । सेवेनें संपूर्ण सुखी करावीं ॥३८०॥
पिता स्वयमेव नारायण । माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ।
ऐसें भावें ज्याचें भजन । सुपुत्र जाण तो एक ॥८१॥
ज्याचे सेवेनें सुखी पितर । तेंचि पितृतर्पण साचार ।
जितां अवज्ञा तो अनाचार । मेल्या श्राद्धविचार तो लौकिक ॥८२॥
जो पितृवचन अविश्वासी । तेणें केल्या पापराशी ।
जो पितृवचन विश्वासी । मोक्ष त्यापाशीं वोळंगणा ॥८३॥
जितमृतपितृतर्पण । ते सांगीतली उणखूण ।
या नांव गा पितृभजन । ऋषिपूजन तें ऐक ॥८४॥
सन्मानें आणूनि ब्राह्मण । श्रद्धा कीजे चरणक्षाळण ।
चरणतीर्था अभिवंदन । सबाह्य जाण स्वयें कीजे ॥८५॥
धूपें दीपें यथोक्त पूजन । यथारुचि तृप्ति सदन्न ।
यथाशक्ति द्यावें धन । ऋषिपूजन या नांव ॥८६॥
ब्राह्मण तेचि ऋषीश्वर । ब्राह्मणें तृप्त सनत्कुमार ।
ब्राह्मणमुखें शाङर्गधर । धाला ढेंकर देतसे ॥८७॥
बंधु स्वगोत्र स्वजन । त्यांची दरिद्रपीडा दारुण ।
निरसावी देऊनि धन । हा मुख्य धर्म जाण श्रेष्ठत्वें ॥८८॥
कुटुंब पीडूनि आपण । अन्यत्रां द्यावें अन्नधन ।
तोचि अधर्म परिपूर्ण । शुद्ध पुण्य तें नव्हे ॥८९॥
कुटुंबासी यथोचित । सुखी करुनि समस्त ।
याहूनि उरला जो अर्थ । तो श्रेयार्थ वेंचावा ॥३९०॥
अतिथि आलिया देख । अन्न द्यावें आवश्यक ।
तो झालिया पराङ्मुख । पुण्य निःशेष हरासे ॥९१॥
सकळ दीनांमाजीं जाण । अतिश्रेष्ठ अन्नदान ।
दीनास देऊनि सन्मान । द्यावें सदन्न अतिश्रद्धा ॥९२॥
कुटुंब सुखी करी आपण । स्वेच्छा दे दीनभोजन ।
परी कदर्थवी जो निजप्राण । तोही दारुण अधर्म ॥९३॥
जैसें कीजे दीनतर्पण । त्यांत आपणही एक दीन ।
तेथ न करुनि अधिकशून्य । करावें भोजन समभागें ॥९४॥
पंक्तीमाजीं प्रपंचपण । तें अन्नदानीं अतिविघ्न ।
यालागीं करावें भोजन । समभागीं आपण सकळांसीं ॥९५॥
धनाचा सद्वययो खरा । द्यावें अनाथप्रेतसंस्कारा ।
अर्पावें दीनांच्या उद्धारा । धाडावें घरा अयाचितांच्या ॥९६॥
अंध पंगु मुके दीन । यांसी संरक्षी जो आपण ।
त्याचेंचि सार्थक धन । शुद्ध पुण्य तयाचें ॥९७॥
साधुसज्जनां विचंबू अडी । तो विचंबू जो सधन तोडी ।
त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥९८॥
दुर्बळ जो कां भगवद्भक्त । त्यासी संरक्षी जो धनवंत ।
तेणें तुष्टला भगवंत । त्यातें उद्धरीत भक्ताआधीं ॥९९॥
सकळमंगळां मंगळ पूर्ण । सकळ कल्याणांचें कल्याण ।
ते हे सद्गुरुश्रीचरण । तेथ निजधन जयांचें अर्पे ॥४००॥
तयांच्या निजधर्माचें निशाण । सत्यलोकीं लागलें जाण ।
वैकुंठीं कैलासीं संपूर्ण । भेरीनिशाण त्राहाटिलें ॥१॥
स्वधर्में जोडलें निजधन । जो करी सद्गुरुसी अर्पण ।
तोचि कर्मीं निष्कर्म जाण । परम पावन तो एक ॥२॥
जो चढत्यावाढत्या भगवद्भक्ती । गुरुसी अर्पी निजसंपत्ती ।
त्यातें अंगीकारुनि लक्ष्मीपती । आपुली निजभक्ती त्यासी दे ॥३॥
ज्यासी अनन्य गुरुभक्ती । त्याच्या द्वारीं चारी मुक्ती ।
दासीत्वें उभ्या असती । त्यापासोनि श्रीपती परता नव्हे ॥४॥
ज्याचें तनु मन धन । गुरुचरणीं अर्पे पूर्ण ।
त्यासी भवभयाचें भान । कल्पांतीं जाण दिसेना ॥५॥;
दैवें जोडली जे संपत्ती । ते वेंचोनि ऐशा निगुतीं ।
अर्थें परमार्थप्राप्ती । सभाग्य लाहती निजनिष्ठा ॥६॥
ऐसे न वेंचोनि धन । स्वयाति कुटुंब पीडी पूर्ण ।
जो पोटा न खाय आपण । तें यक्षधन संचित ॥७॥
एवं कदर्थूनि निजप्राण । जें संचिलें यक्षधन ।
तें अधःपातासी कारण । दुःख दारुण धनलोभ्या ॥८॥
म्हणे मीही याच निष्ठा । यक्षवित्तें झालों करंटा ।
हातींचा स्वार्थ गेला मोटा । वंचलों कटकटा निजमोक्षा ॥९॥
सांचोनियां यक्षवित्त । म्यां माझें केलें अनहित ।
ऐसा तो खेदयुक्त । कष्टें बोलत निजदुःख ॥४१०॥;