श्लोक २२ व २३ वा
संख्याने सप्तदशके, भूतमात्रेन्द्रियाणि च ।
पञ्चपञ्चैकमनसा, आत्मा सप्तदशः स्मृतः ॥२२॥
तद्वत् षोडशसंख्याने आत्मैव मन उच्यते ।
भूतेन्द्रियाणि पञ्चैव मन आत्मा त्रयोदश ॥२३॥
पंच विषय पंच भूतें । पांच इंद्रियें घेतलीं येथें ।
मन आत्मा मेळवूनि तेथें । केलीं निश्चितें सतरा हीं ॥३॥
यापरी तूं गा जाण । सोळा तत्त्वांचें निरुपण ।
तेथेंचि त्रयोदशलक्षण । स्वयें नारायण सांगत ॥४॥
सतरा तत्त्वांचें निरुपण । तुज सांगीतलें संपूर्ण ।
त्यांत मन आत्मा एक जाण । तेंही लक्षण अवधारीं ॥५॥
जेवीं कां कथा सांगतां आपण । स्वभावें हात हाले जाण ।
तेवीं मनाचें चंचळपण । स्वभावें जाण होतसे ॥६॥
राजा सिंहासनीं बैसला । तो राजत्वें पूज्य झाला ।
वसंत खेळतां धांविन्नला । तरी काय मुकला राज्यपदा ॥७॥
जेवीं काळें क्षोभला अतिथोर । तरी तो बोलिजे सागर ।
कां निश्चळ राहिलिया नीर । तरी समुद्र समुद्रत्वें ॥८॥
तेवीं मनपणें अतिचंचळ । कां आत्मत्वें निजनिश्चळ ।
दोहींपरी अविकळ । जाण केवळ परमात्मा ॥९॥
यालागीं मनाचें जें मनपण । आत्मसाक्षात्कारेंवीण ।
कोणासी न कळेचि गा जाण । हें मुख्य लक्षण मनाचें ॥२१०॥
मनआत्म्यांचें उभयऐक्य । तेंचि सतरांमाजीं उणें एक ।
उरलीं तीं आवश्यक । सोळा हीं देख निजतत्त्वें ॥११॥
पांच इंद्रियें पंच महाभूतें । अकरावें मन ठेवूनि तेथें ।
जीव शिव दोनी घेऊनि येथें । केलीं निश्चितें तेराचि ॥१२॥
आणिकही नाना तत्त्वमतें । मागां पुशिलीं तुवां मातें ।
तींही सांगेन मी तूतें । सुनिश्चितें उद्धवा ॥१३॥