श्लोक ८ वा
विलक्षणः स्थूलसूक्ष्माद् देहादात्मेक्षिता स्वदृक् ।
यथाग्निर्दारुणो दाह्याद् दाहकोऽन्यः प्रकाशकः ॥८॥
स्थूलसूक्ष्मदेहांहून । आत्मा तो सर्वदा भिन्न ।
तेणें वेगळेपणें जाण । करी वर्तन प्रपंचीं ॥५५॥
जीव उभय देहीं वर्ततां । प्राणियांसी देहातीतता ।
स्फुरत असे सर्वथा । तोचि तत्त्वतां नेणती ॥५६॥
म्हणे 'माझा डोळा दुखों लागला' । परी न म्हणे ' मीचि दुखों आला' ।
माझा पावोचि मोडला' । परी ' मी मोडला ' हें न म्हणे ॥५७॥
यापरी देहीं वर्ततां । प्रत्यक्ष सांगे देहातीतता ।
हे आपुली आपणां अवस्था । न कळे भ्रांता देहभ्रमें ॥५८॥
द्रष्टा दृश्य नव्हे सर्वथा । तें जड तो चेतविता ।
एवं आत्म्यासी विलक्षणता । जाण तत्त्वतां या हेतू ॥५९॥
विलक्षणता दों प्रकारेंसीं । एक ते जाण द्रष्टेपणेंसी ।
दुसरी ते स्वप्रकाशेंसी । देहद्वयासी विलक्षण ॥२६०॥
द्रष्टा दृश्याहूनि भिन्न । तरी 'तो म्हणसी झाला मन' ।
तें चार्वाकमत जाण । मनपण त्या नाहीं ॥६१॥
अकरा इंद्रियांमाजीं जाण । मन तेंही एक करण ।
करणत्वें त्या जडपण । आत्मा नव्हे जाण या हेतू ॥६२॥
प्रपंचीं मनाची दक्षता । तें मनपणेंचि नव्हे तत्त्वतां ।
जेवीं प्राणेंवीण नृपनाथा । न दिसे सर्वथा निजभाग्य ॥६३॥
शस्त्राचेनि एकें घायें । छेदिले लोहार्गळसमुदाये ।
तें शस्त्राचें सामर्थ्य नोहे । बळ पाहें शूराचें ॥६४॥
लोहाचा लोहगोळ । अग्निसंगें झाला इंगळ ।
धडधडां निघती ज्वाळ । तें नव्हे बळ लोहाचें ॥६५॥
त्या लोखंडाऐसें जड मन । त्यासी चित्प्रभा प्रकाशून ।
प्रकृतीमाजीं प्रवर्तन । करवी जाण श्रेष्ठत्वें ॥६६॥
पाव्यामाजीं रागज्ञान । केल्या अतिमधुर गायन ।
तो पाव्याचा नव्हे गुण । कळा जाण गात्याची ॥६७॥
तैसा मनाचा जो व्यापार । तो जाण पां परतंत्र ।
नव्हे याचा तो स्वतंत्र । जड विचार मनाचा ॥६८॥
सूर्याचेनि किरणसंगें । सूर्यकांतीं अग्नि निघे ।
तैसें आत्माचेनि प्रकाशयोगें । मन सवेगें वर्तत ॥६९॥
मन जडत्वें जड जाण । आत्मा स्वप्रकाशें प्रकाशघन ।
मन तें आत्म्याआधीन । आत्मा स्वधीन आत्मत्वें ॥२७०॥
प्रत्यक्ष म्हणे 'माझें मन' । परी 'मीचि मन' न म्हणे जाण ।
यालागीं मनाहूनि आत्मा भिन्न । वेगळेपणें साक्षित्वें ॥७१ ॥
देहद्वयाहूनि भिन्न । दृढ साधूनि आत्मज्ञान ।
देहात्मबुद्धीचें छेदन । केलें जाण शिष्याचें ॥७२॥
यालागीं देहात्मवादी । जे सत्य मनिती उपाधी ।
ते मिथ्या केली त्रिशुद्धी । शुद्ध बुद्धि ते नव्हे ॥७३॥
मनावेगळा साधिला पाहा हो । तो तुं म्हणसी पितामहो ।
तो देवांमध्यें श्रेष्ठ देवो । हाही संदेहो न धरावा ॥७४॥
हो का कल्पाचिये आदी । ब्रह्मयासी मौढ्य होतें आधीं ।
करूं न शके सृजनविधी । जड बुद्धि तयाची ॥७५॥
त्यासी करूनि सावधान । म्यांचि प्रकाशिलें निजज्ञान ।
तेव्हां तो झाला ज्ञानसंपन्न । सृष्टिसृजन करावया ॥७६॥
नाभिकमळीं जन्मलें केवळ । ब्रह्मा माझे पोटींचें बाळ ।
माझ्या दोंदावरी खेळे खेळ । आत्मा केवळ तो नव्हे ॥७७॥
जितुका देवांचा समुदावो । तितुका प्रकाश्यचि पाहा हो ।
मी प्रकाशकु अनादि देवो । स्वप्रकाशस्वभावो आत्मा तो मी ॥७८॥
देहद्वय आणि मन । त्यांहूनि आत्मा विलक्षण ।
हिरण्यगर्भाहूनि जाण । विलक्षणपण आत्म्याचें ॥७९॥
हिरण्यगर्भचि परमात्मा । हेंही न घडे गा भक्तोत्तमा ।
मी हिरण्यगर्भाचाही आत्मा । माझी महिमा त्या कैंची ॥२८०॥
एवं हिरण्यगर्भउपासना । ते साधनारूपेंचि सेवना ।
परी केवळ आत्मपणा । न ये जाणा मायिकत्वें ॥८१॥
तेचि विलक्षणता । आणोनियां दृष्टांता ।
साधीतसें तत्त्वतां । भक्तांच्या हाता चढे जेणें ॥८२॥
अग्नि काष्ठामाजीं वसे । परी तो काष्ठचि होऊनि नसे ।
मथिल्या काष्ठीं प्रकट दिसे । जाळी उल्हासें काष्ठातें ॥८३॥
तैसा आत्मा देहीं असे । तो देहोचि होऊनि नसे ।
ब्रह्मज्ञानें जेव्हां प्रकाशे । जाळी अनायासें देहभाव ॥८४॥
असोनि एके ठायीं जाण । दाह्याहूनि दाहक भिन्न ।
तैसें प्रकाश्याहूनि जाण । भिन्नपण स्वप्रकाशा ॥८५॥
अग्निदृष्टांतें निश्चित । आत्मयाचें निजतत्त्व ।
नित्यत्व आणि विभुत्व । असे साधित निजबोधें ॥८६॥
काष्ठाचेनि योगें अग्नीसी । जन्मनिरोधु नामरूपांसी ।
पावे तेवीं आत्मयासी । विकारता तैसी देहयोगें ॥८७॥