श्लोक ४८ वा
य एतदानन्दसमुद्रसम्भृतं, ज्ञानामृतं भागवताय भाषितम् ।
कृष्णेन योगेश्वरसेविताङघ्रिणा, सच्छ्रद्धयाऽऽसेव्य जगद्विमुच्यते ॥४८॥
जे योगेश्वर योगस्थिती । जे पावले जीवन्मुक्ती ।
तेही कृष्णचरण सेविती । ऐशी पूज्य मूर्ती श्रीकृष्णाची ॥६९॥
पदीं रंगले सनकादिक । संत सज्जन अनेक ।
ब्रह्मादिक तेथें रंक । ऐसा श्रेष्ठ देख श्रीकृष्ण ॥९७०॥
तेणें श्रीकृष्णें स्वानंदस्थिती । प्रगट केली निजभक्ती ।
अतिकृपा उद्धवाप्रती । स्वमुखें श्रीपती बोलिला ॥७१॥
भगवद्भक्ति महासागर । तेथें निजधैर्य तोचि मंदर ।
गुरुशिष्ययुक्ति सुरासुर । मथनतत्पर साटोपें ॥७२॥
भाव विश्वास दोनी मांजरीं । बोध रविदोर दृढ धरी ।
प्रत्यगावृत्ति अभ्यासेंकरीं । मंथन निर्धारीं मांडिलें ॥७३॥
तेथ मथनीं प्रथमदृष्टीं । ’अहं ज्ञाता’ हें हालाहल उठी ।
तें विवेकशिवें धरिलें कंठीं । पुढती अहं नुठी गिळिलें तैसें ॥७४॥
निरभिमानें मथूनि मथित । काढिलें भक्तिसारामृत ।
तें उद्धवालागीं श्रीकृष्णनाथ । कृपेनें निश्चित अर्पिलें ॥७५॥
धर्म अर्थ काम मुक्ती । चहूं पुरुषार्थाही वरती ।
श्रीकृष्णें सारामृत-निजभक्ती । उद्धवाहातीं अर्पिली ॥७६॥
निजबोधाचें पात्र जाण । निजानुभवें आसाऊन ।
तेथें हें सारामृत भरोन । करविलें प्राशन उद्धवासी ॥७७॥
तेणें उद्धव निवाला । त्रिविधतापें सांडवला ।
परम सुखें सुखावला । परब्रह्मीं जडला ब्रह्मत्वें ॥७८॥
भक्तिसारामृतप्राशन । उद्धवें करोनियां जाण ।
पावला परम समाधान । ऐसा कृपाळु श्रीकृष्ण निजभक्तां ॥७९॥
कृष्ण उद्धव संवाद पूर्ण । भक्तिसारामृत गुह्यज्ञान ।
याचें जो करी सेवन । श्रवणमनन निदिध्यासें ॥९८०॥
ऐसें जो करी कथासेवन । त्या भेणें पळे भवबंधन ।
स्वप्नीं न देखे जन्ममरण । हाही नव्हे जाण नवलावो ॥८१॥
जे लागोनि त्याचे संगती । दृढावले ये कथेचे भक्तीं ।
त्यांसी भवभयाची प्राप्ती । न बाधी कल्पांतीं कुरुराया ॥८२॥
ज्यासी या कथेची श्रद्धा पूर्ण । ज्यासी या कथेचें अनुसंधान ।
ज्यासी ये कथेचें अनुष्ठान । तो उद्धरी जाण जगातें ॥८३॥
जो सूर्याचे घरीं राहिला । त्यासी रात्रीचा यावा ठेला ।
मा जो त्याचे गांवींच वसला । तोही मुकला रात्रीसी ॥८४॥