श्लोक १४ वा
ते वेषयित्वा स्त्रीवेषैः साम्बं जाम्बवतीसुतम् ।
एषा पृच्छति वो विप्रा अन्तर्वत्न्यसितेक्षणा ॥१४॥
पहिलेच श्रीमदें उद्धट । त्यावरी मांडिलें कपट ।
सांबास देऊनि स्त्रीनट । अतिवरिष्ठ बाणला ॥४७॥
तो श्यामसुंदर डोळसु । अंगा शोभला स्त्रीवेषु ।
प्रमदावैभवविलासु । दावी विन्यासु सलज्ज ॥४८॥
नयनीं सोगयाचें काजळ । व्यकंट कटाक्षु अतिचपल ।
सुंदर सुकुमार वेल्हाळ । चाले निश्चळ हंसगती ॥४९॥
वस्त्रें बांधोनियां उदर । नावेक केलें थोर ।
तेणें ते गरोदर । दिसे साचार इतरांसी ॥३५०॥
हात घालूनि सखियांच्या खांदीं । चालतां उदर हालों नेदी ।
विसांवा घेत पदोपदीं । येतां ऋषिवृंदीं देखिली ॥५१॥
ऐसा स्त्रीवेष दाखवूनि । नावेक अंतरें राहोनि ।
इतर ऋषींजवळी येऊनि । लोटांगणें घालिती ॥५२॥
पूर्वश्लोकींचा श्र्लोकार्थ तेथ । व्याख्यान नव्हेच समस्त ।
यालागीं तेंचि येथ । वाखाणिजेत कथान्वयें ॥५३॥
छळाचेनि मिषें जाणा । ऋषींसि करिती प्रदक्षिणा ।
अत्यादरें लागती चरणा । म्हणती दर्शना आम्ही आलों ॥५४॥
ऐसे यदुकुमार समस्त । अविनीत परी विनीतवत ।
कर जोडोनि राहिले तेथ । मृदु विनवीत मुनीश्वरां ॥५५॥
स्वामी पैल हे जे सुंदर । तुमच्या वचनीं भावार्थ थोर ।
आसन्नप्रसव गरोदर । स्वयें सुकुमार पुसों लाजे ॥५६॥