श्लोक १५ वा
छिद्यमानं यमैरेतैः, कृतनीडं वनस्पतिम् ।
खगः स्वकेतमुत्सृज्य, क्षेमं याति ह्यलम्पटः ॥१५॥
जेवीं कां वृक्षाचे अग्रीं नीड । पक्षी करुनि वसे अतिगूढ ।
तळीं त्याचि वृक्षाचें बूड । छेदिती सदृढ निर्दय नर ॥५६॥
तें देखोनि वृक्षच्छेदन । पक्ष्यें सांडोनि गृहाभिमान ।
पळाल्या पाविजे कल्याण । राहतां मरण अचूक ॥५७॥
त्या वृक्षाचिया ऐसें जाण । देहासवें लागलें मरण ।
तेथें जीवासी राहतां जाण । दुःख दारुण अनिवार ॥५८॥