श्लोक ३४ वा
यथा हि भानोरुदयो नृचक्षुषां, तमो विहन्यान्न तु सद्विधत्ते ।
एवं समीक्षा निपुणा सती मे, हन्यात्तमिस्त्रं पुरुषस्य बुद्धेः ॥३४॥
डोळां नांदते दृष्टीसी । तम अवरोधी तियेसी ।
सूर्य उगवूनि तमातें निरसी । परी नवे दृष्टीसी नुपजवी ॥४॥
तेवीं अविद्या क्षोभूनि सबळ । आत्मा नाहीं न करवेच केवळ ।
पुरुष बुद्धीस आणोनि पडळ । मिथ्या द्वैतजाळ दाखवी ॥५॥
तेथ पावल्या शुद्ध ज्ञानासी । अविद्या मळ मात्र निरसी ।
परी नवें उपजवावया आत्म्यासी । सामर्थ्य ज्ञानासी असेना ॥६॥
आत्मा निजप्रकाशेंसीं । ज्ञानाज्ञानातें प्रकाशी ।
तें ज्ञानाज्ञान परमात्म्यासी । कदाकाळेंसीं स्पर्शेना ॥७॥
ज्ञानाज्ञानविकार । अविद्यांतःपाती साचार ।
आत्मा अविद्येहूनि पर । नित्य निर्विकार या हेतू ॥८॥
रात्रि नाहीं सूर्यासी । मा दिवसु काय आहे त्यासी ।
तेवीं ज्ञानाज्ञान आत्म्यासी । कदाकाळेंसीं स्पर्शेना ॥९॥
आत्मा निर्विकार स्वयंज्योती । अलिप्त ज्ञानाज्ञानस्थिती ।
त्या स्वरुपाची सहज प्राप्ती । उद्धवाप्रति हरि सांगे ॥५१०॥