श्लोक १ ला व २ रा
श्रीभगवानुवाच ।
न रोधयति मां योगो न साङ्ख्यं धर्म एव च ।
न स्वाध्यायस्तपस्त्यागो नेष्टापूर्तं न दक्षिणा ॥१॥
व्रतानि यज्ञश्छन्दांसि तीर्थानि नियमा यमाः ।
यथावरुन्धे सत्सङ्गः सर्वसङ्गापहो हि माम् ॥२॥
मज वश करावयालागीं । सामर्थ्य नाहीं अष्टांगयोगीं ।
नित्यानित्यविवेक जगीं । आंगोवांगी मज न पवे ॥२४॥
प्रकृतिपुरुषविवंचना । अखंड आलोडितां मना ।
पावावया माझिया स्थाना । सामर्थ्य जाणा त्या नाहीं ॥२५॥
धर्म अहिंसादिसहित सत्य । त्यांचेनि मी नव्हें प्राप्त ।
मुख्य वेदाध्ययनेंही मी अप्राप्त । साङ्ग समस्त जरी पढिले ॥२६॥
तेथ तपें कायसीं बापुडीं । पंचाग्नि असार परवडी ।
कृच्छ्रचांद्रायणें झालीं वेडीं । त्यांचे जोडी मी न जोडें ॥२७॥
देहगेह सांडूनि उदास । विरजाहोमीं हवी सर्वस्व ।
साधनीं अतिश्रेष्ठ संन्यास । त्यासी मी परेश नातुडें ॥२८॥
करितां श्रौतस्मार्तकर्मांसी । कर्मठें झालीं पानपिसीं ।
तरी मी नाकळें त्यांसी । क्लेश होमेंसीं कष्टतां ॥२९॥
गोदान भूदान तिलदान । पान देतां धनधान्य ।
त्यांसीं मी नाटोपें जाण । दानाभिमान न वचतां ॥३०॥
संकटचतुर्थी ऋषिपंचमी । विष्णुपंचक बुधाष्टमी ।
अनेक व्रतें करितां नेमीं । ते मी कर्मीं नातुडें ॥३१॥
अश्वमेघ राजसूययाग । सर्वस्व वेंचूनि करितां साङ्ग ।
माझे प्राप्तीसी नव्हतीचि चांग । तेणें मी श्रीरंग नाटोपें ॥३२॥
हो कां वापी कूप आराम । वृक्षरोपण वनविश्राम ।
आचरतां स्मार्तकर्म । मी आत्माराम न भेटें ॥३३॥
नाना छंद रहस्यमंत्र । विधिविधाने अतिविचित्र ।
सामर्थ्यें अतिविशेष पवित्र । नव्हती स्वतंत्र मत्प्राप्ती ॥३४॥
पुष्करादि नाना तीर्थें । पापनिर्दळणीं अतिसमर्थें ।
शीघ्र पावावया मातें । सामर्थ्य त्यांतें असेना ॥३५॥
यमनियम अहर्निशीं । जे सदा शिणती साधनेंसीं ।
ते यावया माझ्या द्वारासी । सामर्थ्य त्यांसी असेना ॥३६॥
उद्धवा यमनियमनिर्धार । एकुणिसावे अध्यायीं सविस्तर ।
तुज मी सांगेन साचार । संक्षेपाकार बारावा ॥३७॥
ते यमनियम बारा बारा । आणि सकळ साधनसंभारा ।
यावया माझिया नगरा । मार्गु पुढारा चालेना ॥३८॥
ते गेलिया संतांच्या दारा । धरूनि साधूच्या आधारा ।
अवघी आलीं माझ्या घरां । एवं परंपरा मत्प्राप्ती ॥३९॥
तैसी नव्हे सत्संगती । संगें सकळ संगांतें छेदिती ।
ठाकठोक माझी प्राप्ती । पंगिस्त नव्हती आणिका ॥४०॥
किडी भिंगुरटीच्या संगतीं । पालटली स्वदेहस्थिती ।
तेवीं धरिलिया संतांची संगती । भक्त पालटती मद्रूपें ॥४१॥
केवळ पाहें पां जडमूढें । चंदनासभोंवतीं झाडें ।
तीं सुगंध होऊनि लांकडें । मोल गाढें पावलीं ॥४२॥
तीं अचेतन काष्ठें सर्वथा । चढलीं देवब्राह्मणांचे माथां ।
त्यांचा पांग पडे श्रीमंता । राजे तत्त्वतां वंदिती ॥४३॥
तैशी धरिल्या सत्संगती । भक्त माझी पदवी पावती ।
शेखीं मजही पूज्य होती । सांगों किती महिमान ॥४४॥
संतसंगतीवेगळें जाण । तत्काळ पावावया माझें स्थान ।
आणिक नाहींच साधन । सत्य जाण उद्धवा ॥४५॥
मागां बोलिलीं जीं साधनें । तीं अवघींही मलिन अभिमानें ।
ऐक तयांचीं लक्षणें । तुजकारणें सांगेन ॥४६॥
अष्टांगयोगीं दुर्जयो पवन । सर्वथा साधेना जाण ।
साधला तरी नागवण । अनिवार जाण सिद्धींची ॥४७॥
नित्यानित्यविवेकज्ञान । तेथ बाधी पांडित्यअभिमान ।
प्रबळ वांच्छी धनमान । ज्ञानचि विघ्न ज्ञान्यासी ॥४८॥
अहिंसाधर्म करितां जनीं । धर्मिष्ठपणीं गाळिती पाणी ।
गाळितां निमाल्या जीवश्रेणी । अधर्मपणीं तो धर्म ॥४९॥
करितां वेदाध्ययन । मुख्य वेदें धरिलें मौन ।
पठणमात्रें मी नातुडें जाण । याजनदान वांच्छिती ॥५०॥
तप करूं जातां देहीं । क्रोध तापसांच्या ठायीं ।
परता जावों नेदी कंहीं । वाढला पाहीं नीच नवा ॥५१॥
सर्वस्वत्यागें संन्यासग्रहण । तेथही न जळे देहाभिमान ।
व्यर्थ विरजाहोम गेला जाण । मानाभिमान बाधिती ॥५२॥
श्रौत स्मार्त कर्म साङ्ग । इष्टापूर्त जे कां याग ।
तेथ आडवा ठाके स्वर्गभोग । कर्मक्षय रोग साधकां ॥५३॥
नाना दानें देतां सकळ । वासना वांच्छी दानफळ ।
कां दातेपणें गर्व प्रबळ । लागला अढळ ढळेना ॥५४॥
अनंतव्रतें व्रती झाला । चौदा गांठीं देवो बांधला ।
शेखीं अनंतातें विसरला । देवो हरविला हातींचा ॥५५॥
नाना यज्ञ करितां विधी । मंत्र तंत्र पात्रशुद्धी ।
सहसा पावों न शके सिद्धी । पावल्या बाधी फळभोगू ॥५६॥
नाना छंदें रहस्यमंत्र । विकळ हों नये उच्चार ।
मंत्रीं मंत्र रचिले साचार । चळले अपार मंत्रवादी ॥५७॥
भगवीं करूनि तांबडीं । तीर्थाभिमानें जाले कापडी ।
भिके लागलीं बापुडीं । नाहीं अर्धघडीं विश्रांती ॥५८॥
यमनियम बारा बारा । करितां अखंड बोरबारा ।
चोविसांमाजीं यांचा उभारा । नेणती सोयरा पंचविसावा ॥५९॥
एवं सांगीतल्या साधनांसी । आपमतीं करितां त्यांसी ।
बाधकता आहे सर्वांसी । ते म्यां तुजपासीं सांगीतली ॥६०॥
करितां साधनें आपमतीसी । तेणें विघ्नें उपजती ऐसी ।
तींच साधनें साधु उपदेशीं । सर्वही सिद्धीसी पावती ॥६१॥
साधु न सांगतां निर्धारीं । नाना साधनें हा काय करी ।
कोण विधान कैसी परी । निजनिर्धारीं कळेना ॥६२॥
न करितां साधनव्युत्पत्ती । केवळ जाण सत्संगती ।
मज पावले नेणों किती । तें मी तुजप्रती सांगेन ॥६३॥