श्लोक १८ वा
हित्वाऽत्यायासरचिता गृहापत्यसुहृच्छ्रियः ।
तमो विशन्त्यनिच्छन्तो, वासुदेवपराङमुखाः ॥१८॥
मरणेंसीं झटें घेत । श्री मेळविती श्रीमंत ।
गृह दारा पुत्र वित्त । नाना वस्तुजातसंग्रहो ॥९३॥
ऐसे भोग आयासयुक्त । सांडूनि ज्ञानगर्वी समस्त ।
ज्ञानाभिमानें नेइजेत । अंधतमांत अतिगर्वें ॥९४॥
जेथ अंधाराचे डोळे । होऊनि ठाकती आंधळे ।
तेथ मोहरात्रीचें काळें । अंधतममेळें अधिक कांटे ॥९५॥
जया अंधारातें प्रकाशूं येतां । निखिळ काळा होय सविता ।
जेथ गाढ मूढ अवस्था । अतिमौढ्यता स्वयें पावे ॥९६॥
जेथ सुषुप्तीसी झोंप लागे । आळसु आळसिजे सर्वांगें ।
तेथ घर बांधोनि निजांगें । निंदा क्रोध दोघे सदा वसती ॥९७॥
तेथ भजनविमुख नरां । अधःपतन अभिमानद्वारा ।
जेवीं अथावीं पडिला चिरा । तेवीं बाहेरा निघों न शके ॥९८॥
जे वासुदेवीं सदा विमुख । ज्यासीं हरिभजनीं नाहीं हरिख ।
त्यांची दशा हे अधोमुख । अतिदुःखें दुःख भोगिती ॥९९॥
ऐशी अभक्तांची गति । सांगितली आहाच स्थिति ।
वांचूनि त्यांची दुर्गति । वाग्देवता भीती स्पष्ट वदतां ॥३००॥
अभक्तांची गति बोलणें । यापरीस चांग मुकें होणें ।
प्राणु जावो कां सर्व प्राणें । परी ते दोष कोणें बोलावे ॥१॥
राया तुझिया प्रश्र्नकाजीं । हे दशा बोलणें पडे आजी ।
येर्हवीं अभक्तवादें आम्हांमाजीं । वाचेची पांजी विटाळली नाहीं ॥२॥
यावरी आतां नृपनाथा । वक्ता आणि समस्त श्रोतां ।
राम-स्मरणें तत्वतां । वाचेसी प्रायश्र्चित्ता सवें कीजे ॥३॥
ऐकोनि अभक्तांची गती । अतिशयेंसीं दुःखप्राप्ती ।
राजा कंटाळला चित्तीं । यालागीं निश्र्चितीं हरिनाम स्मरे ॥४॥;
ज्या स्मरविलें हरीतें । तोचि यासी पुसों येथें ।
युगायुगीं भक्त त्यातें । कोणे विधीतें भजन करिती ॥५॥