श्लोक २७ वा
विषयान् ध्यायतश्चित्तं विषयेषु विषज्जते ।
मामनुस्मरतश्चित्तं मय्येव प्रविलीयते ॥ २७ ॥
जो करी विषयांचें ध्यान । तो होय विषयीं निमग्न ।
जो करी सदा माझें चिंतन । तो चैतन्यघन मीचि होय ॥४९॥
स्त्री गेली असतां माहेरीं । ध्यातांचि प्रकटे जिव्हारीं ।
हावभावकटाक्षेंवरी । सकाम करी पुरुषातें ॥३५०॥
नसते स्त्रियेचें ध्यान करितां । प्रकट दिसे यथार्थता ।
मी स्वतः सिद्ध हृदयीं असतां । सहजें मद्रूपता चिंतितां मज ॥५१॥
आवडीं माझें जें चिंतन । चित्त चिंता चिंतितेपण ।
विरोनि होय चैतन्यघन । मद्रूपपण या नांव ॥५२॥
माझे प्राप्तीलागीं जाण । हेंचि गा मुख्य लक्षण ।
माझें ध्यान माझें भजन । मद्रूपपण तेणें होय ॥५३॥
मजवेगळें जें जें ध्यान । तेंचि जीवासी दृढबंधन ।
यालागीं सांडूनि विषयांचें ध्यान । माझें चिंतन करावें ॥५४॥