श्लोक १८ वा
यदुपादाय पूर्वस्तु भावो विकुरुते परम् ।
आदिरन्तो यदा यस्य तत्सत्यमभिधीयते ॥१८॥
प्रकृतिअंगीकारें देख । वस्तूपासाव होती लोक ।
जेवीं निद्रायोगें एक । होय अनेक निजस्वप्नीं ॥६५॥
जेवीं तंतूपासाव कोटि पट । कोटि पटीं तंतु एकवट ।
पाहतां आदि मध्य शेवट । द्वैताचें बोट रिघेना ॥६६॥
तेवीं वस्तूपासोनियां लोक । प्रकृतिपुरुषादि सकळिक ।
आदि-मध्य-अवसानीं एक । द्वैतवार्ता देख असेना ॥६७॥
तंतु सत्य पट मायिक । वस्तु सत्य अविद्या लटिक ।
जें आदि-मध्य-अवसानीं एक । तें सत्य निष्टंक उद्धवा ॥६८॥
जेवीं कां काष्ठाची बाहुली । काष्ठावयवें शोभे आली ।
तेवीं वस्तु वस्तुत्वें एकली । शोभा पावली जगत्वें ॥६९॥
जेवीं कां एकलें देह देख । दिसे अवयवरुपीं अनेक ।
तेवीं वस्तु एकली एक । आभासे अनेकस्वरुपीं ॥४७०॥
जेवीं कां जळीं क्रीडतां जळा । उपजवी तरंगांच्या माळा ।
तेवीं वस्तूचिया स्वलीळा । जगदादि मेळा प्रकाशे ॥७१॥
तरंगा आदि-मध्य-अवसानीं । जेवीं पाणीपणें असे पाणी ।
तेवीं उत्पत्ति स्थिति-निदानीं । वस्तु वस्तूपणीं अनश्वर ॥७२॥
ब्रह्म सत्य प्रपंच वावो । हा साधकां साधावया निर्वाहो ।
कार्यकारणअभिन्नभावो । देवाधिदेवो बोलिला ॥७३॥
कार्य कारणीं अभिन्न । तैं ब्रह्मीं माया कैंची भिन्न ।
जगद्रूपें ब्रह्म परिपूर्ण । अन्योपदेशें जाण दाविलें ॥७४॥
ब्रह्म माया काळगती । यें तिन्ही अनादि म्हणती ।
तेही न घडे उपपत्ती । येचि अर्थी हरि बोले ॥७५॥;