श्लोक २९ वा
कुयोगिनो ये विहितान्तरायैर्मनुष्यभूतैस्त्रिदशोपसृष्टैः ।
ते प्राक्तनाभ्यासबलेन भूयो, युञ्जन्ति योगं न तु कर्मतन्त्रम् ॥२९॥
ब्रह्मज्ञानार्थ केला त्याग । अभ्यासही मांडिला साङ्ग ।
मध्येंचि वोढवला उपसर्ग । विघ्नें अनेक साधकां ॥१७॥
उपजे कामाचा अतिवेग । खवळे क्रोधाची लगबग ।
शिष्यसुहृदांचे उद्वेग । मनीं उबग स्वहिताचा ॥१८॥
दारारुपें उपसर्ग । देव देती पैं अनेग ।
ऐसा अंतरायीं योगभंग । होतां अनुराग उद्धरी ॥१९॥
अभ्यास करितां अतिनिगुती । दैवें अंतराय योगा येती ।
तेथ निर्वेद उपजल्या चित्तीं । तोचि अभ्यास पुढतीं करी योगी ॥४२०॥
निजयोग अभ्यासबळें । जाळी अंतरायदोष समूळें ।
परी कर्माचीं कर्मठ जाळें । योगी कदाकाळें स्पर्शेना ॥२१॥
अंतरायीं योग छळितां जाण । जरी योगी पावला मरण ।
तरी तो नव्हे कर्माधीन । हें श्लोकार्धें श्रीकृष्ण बोलिला स्वयें ॥२२॥
पूर्वी करितां योगसाधन । अदृष्टगतीं अंतराय जाण ।
योगी पावल्याही मरण । गती कोण तयासी ॥२३॥
अंतरायपरतंत्र । झाल्या योगी पावे जन्ममात्र ।
तेथही नादरी कर्मतंत्र । पूर्वाभ्यासें स्वतंत्र प्रवर्ते योगी ॥२४॥
मार्गस्था मार्गीं गुंती । पडोनियां लागली वस्ती ।
तो येरे दिवसीं तेचि पंथीं । लागे निश्चितीं निजमार्गा ॥२५॥
यापरी योगिया आपण । प्राक्तनसंस्कारें जाण ।
योगाभ्यास करी पूर्ण । परी कर्माधीन कदा नव्हे ॥२६॥
साधनीं असतां माझी भक्ती । तैं अणुमात्र न पडे गुंती ।
मी भक्त कैवारी श्रीपती । राखें अहोरातीं निजभक्ता ॥२७॥
जेथ माझे भक्तीची आवडी । तेथ विघ्नें केवीं रिघतीं बापुडीं ।
महाविघ्नांचिया कोडी । माझें नाम विभांडी उद्धवा ॥२८॥
भजनहीन योगीश्वर । अंतरायें पावे जन्मांतर ।
तरी तो कर्मीं कर्मपर । नव्हे साचार पूर्वसंस्कारें ॥२९॥
’जे पावले जीव जीवन्मुक्ती । तेही प्रारब्धकर्में वर्तती ।
मा योगभ्रष्ट कर्म त्यागिती । घडे कैशा रीतीं’ म्हणशील ॥४३०॥
मुक्ताचें जें मोक्षस्थान । तेंचि साधकाचें मुख्य साधन ।
यालागीं त्या दोघांही जाण । कर्मबंधन बाधीना ॥३१॥
मी एक कर्मकर्ता । ऐशी ज्यास नुपजे अहंता ।
त्यासीही जाण सर्वथा । कर्मबंधकता स्पर्शेना ॥३२॥