श्लोक १३ व १४ वा
वायुना हृतगन्धा भूः सलिलत्वाय कल्पते ।
सलिलं तद्धृतरसं ज्योतिष्टवायोपकल्पत ॥१३॥
हृतरुपं तु तमसा वायौ ज्योतिः प्रलीयते ।
हृतस्पर्शोऽवकाशेन वायुर्नभसि लीयते ॥
कालात्मना हृतगुणं नभ आत्मनि लीयत ॥१४॥
प्रळयवायूचा क्षोभक क्रोधु । तेणें पृथ्वीचा हरिला गंधु ।
तंव तेही विरोनियां प्रसिद्धु । एकवदु जळ जाहलें ॥९१॥
क्षोभला वायु असमसाहस । तो हरी जळाचा जळरस ।
तेव्हां जळाचा होय र्हास । सावकाश प्रळयमहातेजीं ॥९२॥
त्या तेजाचा निजसंभ्रम । वायुबळें ग्रासीत तम।
तेव्हां प्रळयवायु परम । भरोनि व्योम कोंदाटे ॥९३॥
त्या प्रळयवायूचा स्पर्श । चपळतेसी सर्व ग्रास ।
करुनि ठाके अवकाश । तेव्हां वायूतें आकाश निःशेष ग्रासी ॥९४॥