श्लोक ९ वा
यया विचित्रव्यसनाद्भवद्भिर्विश्वतो भयात् ।
मुच्येमह्यञ्जसैवाद्धा तथा नः शाधि सुव्रत ॥९॥
मायाजलें भवसागरु । भरला असे अतिदुस्तरु ।
त्याचा उतरावया पैलपारु । होय तूं तारुं मुनिराया ॥९२॥
याचें सकळ जळ क्षार । माजीं सावजें अनिवार ।
एकएकें चराचर । गिळिलें साचार निजशक्तीं ॥९३॥
लाटांवरी अचाट लाटा । मोहाचिया अतिदुर्घटा ।
आदळती अविवेकतटा । धैर्याचिया कांठा पाडित ॥९४॥
अहं-कुवावो वाजतां थोरु । अवघाचि खवळे सागरु ।
मी-माझेनि गजरें घोरु । अतिदुर्धर गर्जत ॥९५॥
नाना वासनांचा वळसा । पाहें पां भंवताहे कैसा ।
येथ तरावया धिंवसा । नव्हे सहसा सुरनरां ॥९६॥
क्रोधाचें प्रबळ भरतें । भरी द्वेषाचिया तरियांतें ।
असूयातिरस्कारांची तेथें । चिडाणी उते अनिवार ॥९७॥
कामपर्वताचीं शिखरें । विषमें भासती अपारें ।
आशेइच्छेचीं वरी थोरें । झाडें विषयांकुरें वाढलीं ॥९८॥
संकल्पविकल्पांचे मीन । निंदेच्या सुसरी दारुण ।
ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण । सागरीं जाण तळपती ॥९९॥;
एवढाही हा भवसागरु । शोषिता तूं अगस्ती साचारु ।
तुझेनि भवाब्धिपैलपारु । पावों हा निर्धारु जाहला आम्हां ॥१००॥
याचा विश्वतोभय हेलावा । तो आम्हां न बाधी तुमच्या कणवा ।
अप्रयासें नारददेवा । मरणार्णवा मज तारीं ॥१॥
पायीं उतरुन भवसागरु । साक्षात् पावें परपारु ।
ऐसा भागवतधर्मविचारु । तो निजनिर्धारु प्रबोधीं ॥२॥
ऐकोनि वसुदेवाची उक्ती । नारद सुखावला चितीं ।
तोचि अभिप्रावो परीक्षिती । शुक स्वमुखें स्थिति सांगत ॥३॥;