श्लोक १३ वा
वैशारदी सातिविशुद्धबुद्धिः धुनोति मायां गुणसंप्रसूताम् ।
गुणांश्च सन्दह्य यदात्ममेतत् स्वयं च शाम्यत्यसमिद् यथाग्निः ॥१३॥
नाशावया निजमायागुण । शिष्य विशारद बुद्धिनिपुण ।
दैवी संपदेचें अधिष्ठान । सद्गुणीं संपन्न सर्वदा ॥४८॥
ऐसा मुमुक्षु अधिकारवंतु । त्यासी शाब्दपरनिष्णातु ।
गुरूंनीं माथां ठेविला हातु । निजबोधु प्राप्तु तत्काळें ॥४९॥
निजबोधीं बैसतां दृष्टी । गुणकार्य रिघे गुणांच्या पोटीं ।
तेव्हां गुणुचि गुणातें आटी । तमातें घोंटी मध्यमु ॥३५०॥
तम खाऊन रजोगुण । अत्यंत उन्मत्त झाला जाण ।
त्याचें देखोनि उन्मत्तपण । सत्त्वें सत्त्वगुण खवळला ॥५१॥
जेव्हां खवळला सत्त्वगुण । त्यासी न साहे दुजेपण ।
रजोगुणांचें प्राशन । केलें जाण तत्काळ ॥५२॥
केवळ सत्त्वाचा स्वभावो । तेणें निजसुखाचा अनुभवो ।
क्षणक्षणां नीच नवा पहावो । अतिनवलावो अनुभवीं ॥५३॥
तेणें सुखानुभवें देखा । रजतमाच्या बीजकणिका ।
ज्या सृष्टिसृजनीं उन्मुखा । त्याही निःशेखा जाळिल्या ॥५४॥
तेव्हां गुण प्रसवती माया । शोधित सत्त्वें आणिली लया ।
ते सत्त्ववृत्ति एकलिया । अद्वैततया उरलीसे ॥५५॥
तेव्हां 'ब्रह्माहमस्मि' लक्षण । तेंही हों लागलें क्षीण ।
सोहंहंसाची बोळवण । ते संधी जाण होतसे ॥५६॥
तेथ देहींचें गेलें देहपण । जन्ममरणा आलें मरण ।
विश्वाचें न दिसे भान । आनंदघन कोंदला ॥५७॥
तेणें सुखस्वरूप झाली दृष्टी । आनंदमय झाली सृष्टी ।
परमानंदें चढली पुष्टी । स्वानंदे मिठी घातली ॥५८॥
त्या सुखाची मर्यादा । काइसेनिही नव्हे कदा ।
जेथ मौन पडिलें वेदां । वृत्ति तत्पदा पावली ॥५९॥
द्वैत सर्वथा नाहीं पुढें । यालागीं वृत्तीची वाढी मोडे ।
तेव्हा तेही सुखस्वरूपीं बुडे । पुढें वाढे तें नाहीं ॥३६०॥
जैसा निरिंधन अग्नी । जाय निजतेजीं मिळूनी ।
तैशी वृत्ति अद्वैतपणीं । मिळे मिळणीं सुखरूपीं ॥६१॥
गंगा सागर मीनली । ते समुद्रचि होऊनि ठेली ।
कां लवणजळां भेटी झाली । मिठी पडली जळत्वें ॥६२॥
दीपीं दीपु एकवटला । मिळणीं एकुचि होऊनि ठेला ।
तैसा वृत्तीचा लयो झाला । निर्व्यंग पावला निजसुख ॥६३॥
तेव्हां आत्मा एक अद्वैत । तेंही म्हणणें नाहीं तेथ ।
एवं द्वैताद्वैतातीत । नित्य निश्चित निजात्मा ॥६४॥
तो ज्ञानस्वरूप स्वप्रकाश । अविकारी अविनाश ।
अकर्ता अभोक्ता उदास । निर्विशेष निजरूप ॥६५॥
तो अदेही अगोत्र । अचक्षु अक्षोत्र ।
अमनस्क अमंत्र । सर्व मंत्र-मंत्रार्थ जो ॥६६॥
जो अज आद्य अप्रमेय । अतर्क्य अलक्ष्य अव्यय ।
नामरूपादि अभाव्य । भावना भाव ते शून्य ॥६७॥
जो भोग्य भोग नव्हे भोक्ता । जो कार्य कर्म नव्हे कर्ता ।
कर्ता अकर्ता या वार्ता । जेथ सर्वथा निमाल्या ॥६८॥
जो अविनाशी अभंग । जो शुद्ध बुद्ध असंग ।
देहद्वयाचा संग । ज्यातें अंग स्पर्शेना ॥६९॥
आत्म्यावेगळें तें अनित्य । हा पूर्वनिश्चय होतां सत्य ।
आतां बुडाले नित्यानित्य । सबराभरित निजात्मा ॥३७०॥
नेणपण निमालें सर्वथा । बुडाली जाणपणाची अवस्था ।
गुणगुणीगुणातीतता । हेही तत्त्वतां तेथ नाहीं ॥७१॥
उद्धवा परमात्मा तो तत्त्वतां । हा माझा निश्चयो सर्वथा ।
तोचि उपनिषदर्थे अर्थितां । निजात्मता प्रतिपाद्य ॥७२॥
येथ पावलियाहि वृत्ति । होय संसारनिवृत्ति ।
हाचि वेदांतीं सिद्धांतीं । निश्चयो निश्चतीं केला असे ॥७३॥
येथूनि कार्य-कर्मकर्तव्यता । निःशेष खुंटली सर्वथा ।
निजीं निजरूप निजात्मता । जाण तत्त्वतां पावल्या ॥७४॥
हे अद्वैतश्रुतिसुरवाडें । सद्गुरुकृपा-उजियेडें ।
वृत्ति निजात्मपदा चढे । भाग्य केव्हडें पाहें पां ॥७५॥
मी वंद्य देवादिदेवां । त्या माझाही निजज्ञानठेवा ।
परम कृपेनें उद्धवा । तुज म्यां आघवा दीधला ॥७६॥
तुज होआवया निवृत्ती । हाचि अर्थु नानासंमतीं ।
सांगितला परम प्रीतीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥७७॥
आतां देहादिक जे असंत । अतिनिंद्यत्वें कुत्सित ।
तेथ आतळों नेदीं चित्त । होई अलिप्त परमार्थीं ॥७८॥
हे तुज झाली अलभ्य प्राप्ती । परी यत्न करावा अतिनिगुतीं ।
येथ मतांतरें छळूं येती । तेही उपपत्ती परियेसीं ॥७९॥