श्लोक ३ रा
तन्मायाफलरुपेण केवलं निर्विकल्पितम् ।
वाङवनोगोचरं सत्यं द्विजा समभवद्बृहत् ॥३॥
तें बृहत् जें परब्रह्म । जेथ न रिगे रुपनाम ।
जें मनबुद्धीसी अगम्य । जें दुर्गम इंद्रियां ॥८५॥
जें निर्गुण निराकार । जें सत्यस्वरुप साचार ।
जें परेहूनि परात्पर । निर्विकार निजवस्तु ॥८६॥
तेथ अतर्क्य मायाचमत्कार । करी दृश्यद्रष्टृत्वें सविकार ।
तेचि प्रकृति पुरुष साचार । तेणें चराचर वाढवी ॥८७॥
जेवीं रुपासवें छायेची व्यक्ती । तेवीं ब्रह्मीं मायेची निजस्थिती ।
तिणें उपजविली शिवशक्ती । पुरुष प्रकृति द्विधा भेदें ॥८८॥
ब्रह्मांडीं ईश्वरस्वभावो । पिंडीं त्यासीच जीवभावो ।
ऐसा प्रकृतिपुरुषनिर्वाहो । मायेनें पहा हो द्विधा केला ॥८९॥
ब्रह्म अच्छेद्य वेदू बोले । तें फाडूनि द्विधा कैसें केलें ।
जेवीं आरिसां आपणा आपुलें । मुख देखिलें संमुख ॥९०॥
आपण पूर्वामुख आहे । प्रतिबिंब पूर्वेकडे न होये ।
आपुलें आपणा संमुख होये । हें लाघव पाहें मायेचें ॥९१॥
प्रतिबिंब दिसतां संमुख । संमुख म्हणतां अतिविमुख ।
पुरुष पूर्वेकडे देख । प्रतिबिंबाचें मुख पश्चिमेकडे ॥९२॥
तेवीं आत्मदृष्टि स्वरुपीं पडें । जीवदृष्टि प्रपंचाकडे ।
येणें संमुखत्व न घडे । विमुखत्व गाढें जीवासी ॥९३॥
तेवीं ब्रह्मीं जें ब्रह्मस्फुरण । तेंचि मूळमायेचें लक्षण ।
तेथ ईश्वरत्वें जाण । होय आपण्या आपण संमुख ॥९४॥
जे अद्वितीय वस्तु शुद्ध । तेथ मिथ्या मायासंबंध ।
अभेदीं उपजवूनि भेद । केलीं द्विविध शिवशक्ती ॥९५॥;