संग्रह ९३
माहेरा मी जाते बाई शिंपीण सयाबाई
आखूड धर बाही नटुली भावजयी
करी बंधु देणं घेणं माय बांधते शिदोरी
कशी माहेराची वाट डोळं दिसते साजरी
सोन कुसुंबी शालूचा आटा नवा उकलला
वहिनी पहा दारी सडा लवंगाच्या झाला
गोड बोला भाऊजी माझी वहिनी प्रीतीची
कशी राघोला दंडते मैना राघोच्या तोलाची
झाडा अंगण साजरे बाई काडीकचर्याचे
लाडा कौतुकाचा भाचा अंगणात नाचे
जाइ मोगर्याच्या कळ्या लाल भरजरी शेल्या
सांगा वहिनी तुम्हाला गुंफता कशा आल्या
नाही दळण कांडण रोज भंगतं रांधणा
नाव पित्याजीला येते थोर बहुत चंदना
दळण दळताना अंगाच्या झाल्या गंगा
माय ग माऊलीनं मला चारल्या लवंगा
चिंता लेकीच्या पित्याला चार पहार घोकणी
कोणाच्या पदरात बांधु माझी हिरकणी
पहा लेकीच्या पित्याचं झालं पांढरं अंगण
बसे पिता पाटावर मांडले कन्यादान
लेकीचे मायबाप कसे इळाचे उपाशी
करिती कन्यादान सोडती एकादशी
काय करु बाई तुझं दैव ना चांगलं
लाल कुंकवानं पुरं नाही कपाळ रंगलं
बारईणी बयनाबाई तांडयात तुझं घर
सावली ग घणघोर
बारईणी बयनाबाई पान देशील शंभर
भरजाणीचा उंबर बंधुची माझ्या बाई
बारईणी बयनाबाइ पान देशील लवलाही
उभी घोडी चव पाई बंधुची माझ्या बाई
बारईणी बयनाबाई पान देजो वीस तीस
ढवळ्या घोडयावर गणेश बंधु माझा बाई
पान ग खाऊ खाऊ रंगली जीबुली
बंधुची ग माझ्या बाई सुर्त सख्याची चांगली
पीतळेचा ग पलंग नेवार ग काळी दोरी
रामा परस सीता गोरी राणी माझी भावजई
पान खाऊ खाऊ रंगल्या आता दाढा
पुसे बारइनीचा वाडा
बारइनी बयनाबाई उघडी तुझी ताटी
आले नवतीच्या पानासाठी बंधु ग माझे बाई
बारइनी बयनाबाई इकडून नको जाऊ
तुझ्या पानाचा नास गहू
चिमूर गाव शहरात हल्ला कशाचा ग झाला
मूल बारयाचा मेला
जावाई ग पाटील आपल्या मातेचे ब्राह्मण
देऊ केली मी कामीनी शारदाबाई
शारदा ग बाई माझी साखर सव्वा तोरा
जावाई पाटील आपल्या मातेचा पदक हिरा