संग्रह ६६
भ्रतार बोले धरधनीन कुठं गेली
पाठीची गौळण हसत दारी आली ।
दुबळा भ्रतार म्हणू नको वेळोवेळ
पाठीचे गौळणी राज्य कर त्याचं बळं ।
लुगडं घेतलं टोप पदर लाल घडी
माझ्या बंधूनी धुंडीली पुणं सातार गंगथडी ।
चाटयाच्या दुकानात उच्च मोलाची ताजी घडी
माझ्या बंदवाच्या श्रीमंताच्या हाती घडी ।
तांबोळ्याचे मुली तुझा हिरवा बाजार
माझा बंधुजी विचारतो नवती केवढया हाजार ।
भाऊबीज केली, केली निम्म्या ग गावाला
माझ्या बंधवाच्या कोडं एकल्या जीवाला ।
बोळवण केलि पाचाहूनही पन्नासाची
हावश्या बंधवानं चोळी घेतली जीन्नसाची ।
भाऊयाबीज केली केलीया वरल्या आळी
हावश्या बंधवाला जेवू घातलं संध्याकाळी ।
भरल्या बाजारात चोळी घेतली गंदापात
आली मनाला टाक हात ।
लग्नाची लग्नतीथ आधी नवरीच्या मामाला
सांगते भाऊराया तुझी आगत आम्हाला ।
डाग दागीन्यांनी मधी भरली कढई
सोन्याच्या सरीसाठी मामा करतो लढाई ।
साळीच्या भाताची मोठी आवड देवाला
साळीच्या भातासाठी जाती जनीच्या गावाला ।
एका मागं एक नका जाऊ बाप लेक
बापाच्या परीस आईचं मोठं सुख ।
आपलं तुपलं कसं लावलं देवानं
बहिणीचं बाळ कडेभर घेतलं भावानं ।
जीव माझा गेला बाप रायाच्या मांडीवरी
पिवळा पिंताबर टाकीते तोंडावरी ।
वाटेनं चालला कोण आखूड बाहीचा
सांगते भाऊराया खरा रुपया चांदीचा ।
वाटच्या वाटसरा वाट कशाला पुसतो
काय सांगू बाई हात वैराचा दिसतो ।
वाटच्या ग वाटसरा अंगावर आला नीट
भाऊरायाच्या नावासाठी कळविली मी वाट ।
आईवरी शिवी नको देऊ आरबटा
डोंगरी ग सागरगोटा मला बीदोबंदी भाटा ।
येडा ग माझा जीव उगच वार्यावानी
बंधु वाटतो आल्यावानी ।
बंधुजी पावयीना शेजी म्हणती कोण राजा
हिरवा मंदील तुरा ताजा ।
बंधुजीला पावण्याला काय करावं जेवायला
तूप भिनू दे शेवायाला ।
उनाच्या रक्कामंदी रक्त कुणाचं धावा घेत
बहिणी कारणं भाऊ येत ।
दिवस मावळला दिवसापाई माझं कायी
बंधू येण्याचि वाट हाई ।
चांगुल तुझं पण किती घालू नजरेत
माझा बंधुराया उभा प्रभुजी बाजारात ।