संग्रह ५७
काय सांगू बाई - मह्या माहेरचा ठसा
भावा आधी बोले भासा - आत्याबाई खाली बसा ।
पिकल्या पानाची - पोटारी झाली रिती
बापाजीची भैन - आत्याबाई आली व्हती ।
सेताच्या बांधाला - कोण घेते मेळवण
बापाजीची भैन - आत्याबाई गवळण ।
कुरूळ्या केसाची - मला नाही ये णी येत
सुगरण तुझी आत ।
देसाई महादेव - मायबाई ग पार्वती
भाई राजस ग माझे - पुढे नंदी शोभा देती ।
हरळीची मुळी - जमीनीला सदासुखी
भाऊ राजसा रे माझ्या - तशी तुझी देशमुखी ।
समस्त सोयरा - ढवळ्या ऊसाचा पाचट
पाठीचा बंधव - नाही करणीला हटत ।
गावोगावचे पाटील - हायेत मगरमस्त
भाई राजस ग महे - पंडित जबरदस्त ।
रस्त्यानं चालले - पंडित डौलत
बंधु देखल्यानं - मव्हं काळीज खुलतं ।
चार भाऊ मव्हे - दगडाच्या चार भिंती
नाना या बख्याला - चवकटीला तेज किती ।
बहीण भावंड - एका भाकरीचा काला
तुहा मव्हा जल्म - एका समिंद्रात झाला ।
पुतळ्याची माळ - काढून ठुली ग खुंटीला
पाठीचा भाऊ मव्हा - नवा ताईत गाठीला ।
वडील भाऊ मव्हा - सर्व्या वाडयाचा नाईक
भाऊच्या ग मह्या - गळां सोन्याचे ताईत ।
बांगडया भरीते - बाई पिवळ्या ताराच्या
बंधवाच्या मह्या - बहिणी मन्सबदाराच्या ।
साळीच्या भाताची - वाफ चाळली दुहेरी
भाऊची ग मह्या - टांगेवाल्याची न्याहारी ।
मशीला मेळवण - खडीसाखरेचे खडे
कानी चवकडे - दादा महे दूध काढे ।
बारा बयलाची - कशी असामी नेटकी
भाऊनं ग मह्या - बैल सोडिले बाटकी ।
झाली साई सांज - दिवा वसरी बाईला
रंगीला दादा मव्हा - सोडी वासरं गाईला ।
मारोतीच्या देवळात - कोण सांगतो पुराण
भाऊचा ग मह्या - गळा सारंगी परमानं ।
दुकानाच्या पुढे - कंदील जळती ग दोन
बंधु दयाळाच्या - दुकानी कारकून ।
पिकल्या पानाचा - ईडा कचेरी जायाचा
पाठीचा मव्हा बंधु - नवा वकील व्हायाचा ।
आईबापाच्या पोटी - पुत्र जल्मला सोनं
बंधु दयाळाचं - बहु मर्जीचं बोलणं ।
सांगून धाडिते - मह्या माणिक मोत्याला
भाऊचं बसणं - पाठ लाऊन जोत्याला ।
बारा हे ग बैल - तेराव्वं आहे घोडं
भाऊ बंधवाला माझ्या - भारी संपत्तीचं येड ।
घोडयाचा बसणार - सेताला गेला पायी
भाऊ बंधवाला मह्या - संपत्तीचा गर्व नाही ।