संग्रह ५५
किती वाट पाहू माझ्या बंधूच्या गाडीची
सावली कलली माझ्या काचाच्या माडीची ।
बहिण भांवडांचं भांडण काही नाही
एका ताटात जेवू घाला तुम्ही मायबाई ।
बहिण भांवडांचं भांडण रानीवनी
भाऊ निकरट बहिणीच्या डोया पाणी ।
भाऊही बोलला बहीणीले घेतो घटी
बोलली भावजय शिवा चोई लावा वाटी ।
भावुला बोलला बहीणीले नान्हा धुना
बोलली भायजय पाण्याची खेप आणा ।
दिवाळीच्या दिशि माझ्या ताटामधी मोती
ओवायाले जाते राण्या भावजयचे पती ।
दिवायीच्या दिशी माया ताटामधी सोनं
ओवायाले जाते भावु माहे कारकून ।
दिवायीच्या दिशी माझ्या ताटामधी मोर
ओवायाले जाते राण्या भावजयचे देर ।
राजे भावजयी राग करु नको माझा
कळीवर घेऊन पति वागवला तुझा ।
माहा बोलणीचा भावजयले राग आला
नेनता तुझा पति खांदी करी वागवला ।
दुरुन वयखीन गाडी बैयलाची चाल
नंदावाची माया शालु धुरकर्याची लाल ।
बहिणीच्या घरी भाऊ गेले समयानं
गर्दी केली उन्हायानं शेले भिजले घामानं ।
बहिणीच्या गावा जाता भाऊ मुराई थाटला
दगडाची वाट जोडा रेशमी फाटला ।
बहिणीच्या गावा जाता आहे येशीमंधी वाघ
पाटचा भाऊ माझ्या बहीणीसाठी जानं भाग ।
बहिणी सार केल्या भावु पाठमोरा झाला
तोडाले ल्याले शेला सखा गव्हीवरी दाटला ।
बहिणीच्या भावा, जात कोण्या गावा
संबोरच्या हयावा अनुटाव माझ्या गावा ।
बहिणीच्या भावा कंबर बांधली
जीभ नाही पानी तीथं शेवळी खंदली ।
वाट पाहु दोन डोये झाले कुंकावानी
एवढी तुमची माया काहुन झाले लोकावानी ।
सभीतुन जाईन माहा आळवा पदर
बन्दवाची माया, माझ्या वाघाची नजर ।