संग्रह २४
धाकलं माझं घर माझं आंगण फेराचं
बाळ खेळतं थोराचं ।
धाकलं माझं घर हंडयाभांडयाचा पसाबीरा
धनी हावशाला किती सांगू वाडा बांदावा दुसईरा ।
वाटबीवैला वाडा वाडा कुणाचा टोलेजंग
कांत माझ्या ग हावशाचा पुढं गिलावा मागं रंग ।
वाटबीबईला वाडा वाडा कुणा या वाण्यायाचा
कांता माझ्या त्या हावशाचा दारी हावद पाण्यायाचा ।
जाऊ गुजरीचं बाळ माझ्या बाळाच्या बरोबरी
मी कां सायास उतरीती एक लिंबू दोघावरी ।
साखबीरचं लाडू दुधा तुपाच्या संगतीचं
माझं ते बाळराज हैती राजाच्या पंगतीचं ।
साखबीरचं लाडू देती बांदून थोडं थोडं
बाळा माझ्याला किती सांगू भूक लागल तीत सोड ।
किती मी हाका मारू गावंदरीच्या नांगर्याला
बंदू माझ्या त्या हावशाला माझ्या संभाळ आगल्याला ।
बारा बैलाचा नांगूइर त्योका हारीबीटीच्या पडी
बंदू माझ्या त्या हावशाचं बारा बईल घरच गडी ।
बारा बैलाचा नांगूईर ताशी लावूनी उभा केला
माझा बंदूजी हावईशा माझा आगल्या कुठं गेला ।
बंदू माझ्यानं केली हौस बारा बैलांच्या जीवावरी
माझ्या त्या बंदूजीनं ऐन लावली धांववरी ।
माझ्या बंदूच्या पाटावरी नार सुंदर धुनं धुती
बंदू माज्याला विचारती तुला हाईत बहिनी किती
बंदूजी माझा बोल भैन एकली भागीरती ।
वाटबीवईला मळा आल्यागेल्याला मुकत्यार
बंदू माज्याला म्हणीत्यात धनी शेताचा समींदर ।
दोपाबीईर झाली माझ्या कुणब्याच्या जेवणाला
बदू माझ्या त्या हावशाचं शेत शिवच्या लवणाला ।
जेवबीनाची पाटी माझ्या कपाळी आला घाम
बंदू माझ्या त्या हावशाची शेत शिवची हाईती लांब ।
सासर्याला जाती भैना संगं दुरडी साखरची
लेक न्हवं ती नाचार्याची सून हाई ती पाटलाची ।
बया मालन विचारती बाई सासरवस कसा
बया मालनी किती सांगूं चित्ताकाचा फासा काढूनी दावूं कसा ।
सोनंबी झालं सस्त ह्या का चांदीचा काय भाव
माझं ते बाळराज कडी तोडयाचं बाजीराव ।
सोनंबी झालं सस्त चांदी कशानं म्हागयीली
कडी नी करदोर्याची मला आगत लागयीली ।
हावस मला मोठी तान्या बाळाच्या टकूच्याची
पिंपळ पानासाठी नथ मोडीते दीडशाची ।
अंगडया टोपडयानं पेठ करिती झगा झगा
माझा ग बाळ तान माझा चिल्लाळ टोपीजोगा ।